Prithviraj Chavan On Reservation: आरक्षणाचा प्रश्न रस्त्यावर सोडविण्याचा प्रयत्न दुर्दैवी- पृथ्वीराज चव्हाण
विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजास कशाच्या आधारावर आरक्षणाचे आश्वासन दिले होते? याचे स्पष्टीकरण द्यायला हवे, असे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी म्हटले आहे.
Maratha Reservation: लोकशाही कुठे चालली आहे हा प्रश्न गंभीर आहेच. पण, एकूण राज्य आणि देशातच काय चालले आहे हे सुद्धा महत्त्वाचे आणि गंभीर आहे. पक्षांतर बंदी कायदा, आरक्षण (Dhangar Reservation) अशा विविध मुद्द्यांवर सरकारचे काय चालले आहे, हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. खास करुन आरक्षणाचा प्रश्न राज्य सरकारने सोडवायला पाहिजे. विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजास कशाच्या आधारावर आरक्षणाचे आश्वासन दिले होते? याचे स्पष्टीकरण द्यायला हवे, असे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी म्हटले आहे. तसेच, आरक्षणाचा मुद्दा रस्त्यावर लढाई करुन सुटणार नाही. ज्यांना तसे वाटते किंवा जे तशा पद्धतीने सोडवायचा प्रयत्न करत आहेत, ते दुर्दैवी असल्याचेही स्पष्ट मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. बारामती येथे अजित पवार यांच्या निवासस्थानाजवळ धनगर समाज आरक्षण संदर्भात आंदोलन सुरु आहे. त्याबाबत प्रसारमाध्यमांनी विचारले असता पृथ्वीराज चव्हाण बोलत होते.
मुख्यमंत्र्यांनी आरक्षणासंदर्भात वेळ मागितला आहे. त्यांनी जर आरक्षणाचा मुद्दा सोडविण्यासाठी शपथपूर्वक वेळ मागितला असेल तर तो द्यायला पाहिजे, असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. पण, राज्यातील विविध मुद्दे सोडवत असताना सामाजिक स्वास्थ्य बिघडता कामा नये. जे पुढारी समाजिक वातावरण बिघडविण्याचे काम करत आहे ते अतिशय दुर्दैवी आहे. सर्वच समाजाने आपापसात खेळीमेळीचे वातावरण ठेवत गुण्यागोविंदाने राहिले पाहिजे. आरक्षणासारखे प्रश्न हे गुंतागुंतीचे आणि कायदेशीर असतात. ते रस्त्यावर सोडवता येत नाहीत आणि सुटतही नाहीत. त्यासाठी योग्य मार्गांनीच गेले पाहिजे. मी स्वत: मुख्यमंत्री असताना आमच्या सरकारने मराठा समाजाला 16% आरक्षण दिले होते. मात्र, पुढे आमचे सरकार गेले. त्यामुळे ते टिकवता आले नाही. आमचं सरकार जर त्यावेळी पुन्हा आलं असतं तर ते आरक्षण नक्की टिकले असेत असं मला वाटतं असेही ते म्हणाले.
मराठा आरक्षणाच्या संदर्भात अधिकार नसताना कायदा करुन समाजाच्या डोळ्यात धुळफेक करण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनी केली की काय, असा सवालही निर्माण होतो. फडणवीस यांनी काय काम केले याच्या खोलात मला जायचे नाही. कारण आरक्षणाचा मुद्दा सोडविण्यासाठी सरकारला वेळ दिला पाहिजे. दरम्यान, संभाजीराजे छत्रपती यांनी छगन भुजबळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. याबाबत विचारले असताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कोणत्याही नेत्याने सामाजिक तेढ निर्माण होणार नाही याचा विचार करुनच वक्तव्य करावीत.