राष्ट्रवादी-कॉंग्रेसची सत्तास्थापन करण्याची तयारी सुरु; आदित्य ठाकरे रात्री घेणार शिवसेना आमदारांची भेट

भाजप (BJP) आणि शिवसेना (Shiv Sena) सत्तास्थापन करण्यात असमर्थ ठरल्याने आता राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. अशाप्रकारे सकाळपासून घडत असलेल्या राजकीय घडामोडी पाहता ऐनवेळी राष्ट्रवादीकडे सर्व सूत्रे आली आहेत

Sharad Pawar (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्रामधील सत्तानाट्याने आज संध्याकाळी अचानक वेग घेतला आहे. भाजप (BJP) आणि शिवसेना (Shiv Sena) सत्तास्थापन करण्यात असमर्थ ठरल्याने आता राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. अशाप्रकारे सकाळपासून घडत असलेल्या राजकीय घडामोडी पाहता ऐनवेळी राष्ट्रवादीकडे सर्व सूत्रे आली आहेत. राज्यपालांच्या निमंत्रणानंतर तातडीने राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक पार पडली आहे. त्यानंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची फोनवर चर्चा झाली. ही चर्चा होते न होते तोपर्यंत आदित्य ठाकरे सेनेच्या आमदारांना भेटण्यासाठी हॉटेलकडे रवाना झाले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेनच्या आमदारांसोबत आदित्य ठाकरे यांची रात्री 12. वा बैठक पार पडणार आहे.

भाजपने सत्ता स्थापनेस नकार दिल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काल (रविवार) शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी आमंत्रण दिले होते. शिवसेनाला 24 तासांची मुदत दिली गेली होती. मात्र आज संध्याकाळी राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसकडून पाठिंब्याचे पत्र न मिळाल्याने शिवसेना सत्ता स्थापन करू शकली नाही. त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या गोटात सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची फोनवर चर्चा झाली असल्याची माहिती आहे. त्यानंतर आता आदित्य ठाकरे आपल्या आमदारांची रात्री 12 वा. मिटिंग घेणार आहेत. (हेही वाचा: राज्यपालानी दिलेल्या मुदतीत सरकार स्थापन करण्यास शिवसेना अयशस्वी; काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्याचा सस्पेन्स कायम)

दरम्यान, नुकतेच अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, 'उद्या रात्री 8.30 वाजेपर्यंत आम्हाला सत्ता स्थापनेची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळ उद्या आमच्या आमदारांची मिटिंग पार पडल्यानंतर, राष्ट्रवादीची कॉंग्रेससोबत चर्चा होईल. त्यानंतर शेवटी शिवसेनेसोबत बोलणी केली जातील. अशाप्रकारे आता तीन पक्ष सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. मात्र आता सर्वच ताबा शरद पवार आणि राष्ट्रवादीकडे आहे. सध्याची परिस्थिती पाहता राज्यात महाशिवआघाडी सत्ता स्थापन करेल असे दिसत आहे, मात्र ते नक्की कसे होते हे उद्याच समजेल.