Narayan Rane यांना जामीन मंजूर झाल्यानंतर Pravin Darekar यांची पहिली प्रतिक्रिया

नारायण राणे यांच्या वक्तव्यामुळे राज्यात राणे विरुद्ध शिवसेना (Rane Vs Shiv Sena) असे वातावरण पाहायला मिळाले.

Narayan Rane, Pravin Darekar (Photo Credit: PTI, Twitter)

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे एकच खळबळ माजली. नारायण राणे यांच्या वक्तव्यामुळे राज्यात राणे विरुद्ध शिवसेना (Rane Vs Shiv Sena) असे वातावरण पाहायला मिळाले. दरम्यान, नारायण राणेंचा अटकपूर्वी जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्यांना रत्नागिरी पोलिसांनी अटक करून महाडच्या न्यायालयात हजर केले. त्यावेळी नारायण राणे यांना 7 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी पोलिसांनी केली होती. परंतु, न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर नारायण राणेंना जामीन मंजूर केला आहे. यावर भाजप नेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

"महाड न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जामीन मंजूर केला आहे. ज्यामुळे भारतीय जनता पक्षाला मोठा दिलासा मिळाला आहे. नारायण राणे यांना जामीन मिळाल्यानंतर पक्षात आनंदाचे वातावरण आहे. आमचा नारायण राणे यांना कालही पाठिंबा होता आणि उद्याही असणार आहे. मात्र, नारायण राणे यांच्यावर झालेली कारवाई चुकीची होती," अशी प्रतिक्रिया प्रविण दरेकर यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे. हे देखील वाचा- Nidhi Choudhari यांची मुंबई उपनगर जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती; राज्य सरकारकडून सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

नारायण राणे यांना अटक केल्यानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, रत्नागिरी पोलिसांनी नारायण राणे यांना महाड न्यायालयात हजर केले असता त्यांच्या समर्थकांनी न्यायालयाबाहेर मोठी गर्दी केली होती. याचपार्श्वभूमीवर नारायण राणे यांना महाड न्यायालयाने जामीन मंजूर केल्याची माहिती मिळताच त्यांच्या समर्थकांसह भाजप कार्यकर्ते आनंद व्यक्त करीत आहेत.