Pratibha Pawar: शरद पवार यांच्या सभेत प्रतिभा पवार यांनी झळकावले बॅनर; बारामती मतदारसंघासह राज्यभर चर्चा
या सभेत प्रतिभा पवार यांनी झळकावलेले बॅनर चर्चेचा विषय ठरले आहे. 'जिकडं म्हातारं फिरतंय तिकडं चांगभलं होतंय..', असा संदेश या बॅनरवर पाहायला मिळत आहे.
शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पत्नी प्रतिभा पवार (Sharad Pawar) यांनी बारामती येथील जाहीर सभेत झळकावलेला फलक सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. 'जिकडं म्हातारं फिरतंय तिकडं चांगभलं होतंय..' असं वाक्य असलेला हा फलक उपस्थितांसरह प्रसारमाध्यमांसाठीही कुतुकलाचा विषय ठरला. महाराष्ट्र विधानसभा (Baramati Assembly Constituency) निवडणुकीसठी (Maharashtra Assembly Elections 2024) सुरु असलेल्या प्रचाराची रणधुमाळी काल (18 नोव्हेंबर) सायंकाळी संपली. या वेळी प्रत्येक राजकीय नेता आणि राजकीय पक्षांनी आपापल्या बालेकिल्ल्यात जाहीर सभा घेतल्या. राष्ट्रवादी काँग्रेस (SP) पक्षाचे नेते शरद पवार यांनीही आपले बारामती येथील उमेदवार युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांच्यासाठी सभा घेतली. याच सभेत पवारांच्या पत्नी प्रतिभाताई यांच्या हातात हे बॅनर पाहायला मिळाले.
शरद पवार यांची सभा
प्रतिभा पवार या तशा प्रसिद्धीपासून काहीशा अलिप्तच असतात. क्वचितच त्या प्रसारमाध्यमे किंवा जाहीर व्यासपीठांवर हजेरी लावतात. मात्र काल सायंकाळी बारामती येथे झालेल्या शरद पवार यांच्या सभेला त्या आवर्जून उपस्थित होत्या. तत्पूर्वी रामती टेक्स्टाईल पार्कच्या फाटकावर प्रवेश करताना त्यांना आडवल्याचीही जोरदार चर्चा झाली होती. दरम्यान, निवडणूक प्रचारात नातू युगेंद्र पवार यांचा प्रचार करतानाही काही ठिकाणी त्या दिसून आल्या. ज्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार टीका करत 'आता नातवाचा इतका पुळका का आलाय असा प्रश्न मी त्यांना निवडणूक संपल्यावर विचारणार आहे' असे म्हटले होते. (हेही वाचा, Sharad Pawar’s Bag Checked: निवडणूक अधिकाऱ्यांकडून शरद पवार यांच्या सामानाची तपासणी, प्रतिभा पवार यांना टेक्सटाईल पार्कच्या बाहेर थांबवले (Watch Video))
पवार विरुद्ध पवार: बारामती येथे काट्याची टक्कर
बारामती विधानसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार असा सामना रंगला आहे. त्यामुळे कधी नव्हे ते प्रथमच पवार विरुद्ध पवार असे चित्र पाहायला मिळत आहे. नाही म्हणायला लोकसभा निवडणुकीतही शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना झाला. ज्यामध्ये सुनेत्रा यांचा मोठ्या मताधिक्क्याने पराभव झाला. अजित पवार यांना हा मोठा झटका मानले गेले. आता बारामतीची जनता विधानसभेला कोणाची निवडण करते याबाबत उत्सुकता आहे. (Ajit Pawar's Bag Checked: अजित पवार यांच्या बॅगा तपासल्या; निवडणूक अधिकाऱ्यांना काय सापडले? सर्वत्र मिष्कील चर्चा)
अजित पवार यांचे राजकीय भवितव्य टांगणीला
शरद पवार यांच्याशीच थेट पंगा घेतल्याने अजित पवार देशभरात चर्चेत आहेत. त्यातच विधानसभा निवडणुकीत ते स्वत: पक्षाचे प्रमुख नेते आणि उमेदवार अशा दुहेरी भूमिकेत आहे. पाठिमागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणाने घेतलेली कलाटणी. जुन्या पक्षांचे झालेले विघटन आणि जन्मासआलेले नवे पक्ष यांमुळे महाराष्ट्राचे राजकारण अभूतपूर्व स्थितीला पोहोचले आहे. अशात अजित पवार यांनीही मूळ पक्षात शरद पवार यांच्यापासून फारक घेत थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरच दावा ठोकला आहे. त्यामुळे ही निवडणूक अजित पवार यांच्या राजकीय भविष्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची मानली जात आहे. त्यांचे भविष्य टांगणीला लागल्याचेही बोलले जात आहे.