Dhule: मंत्री अब्दुल सत्तार यांची गाडी अडवणाऱ्या ABVP कार्यकर्त्यांना पोलिसाकडून मारहाण झाल्याचा आरोप (Watch Video)
कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटामुळे सध्या अनेकांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
महाराष्ट्रामधील धुळे (Dhule) येथे पोलिसांनी काही सामाजिक कार्यकर्त्यांना अमानुष मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटामुळे सध्या अनेकांचे आर्थिक नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची महाविद्यालयीन फी माफ करण्याची विनंती करण्यासाठी, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) सदस्यांनी राज्यमंत्री अब्दुल सत्तार (State Minister Abdul Sattar) यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर पोलिसांनी त्यांना हटवण्याचा प्रयत्न केला पण हे कार्यकर्ते माघार घ्यायला तयार नव्हते आणि त्याच कारणासाठी पोलिसांनी त्यांच्यावर लाठीहल्ला केला. सध्या या गोष्टीचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
या घटनेबाबत सोशल मिडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत असल्याचे दिसत आहे. ही घटना घडत असताना मंत्री अब्दुल सत्तार आपल्या गाडीतच बसून होते, यामुळेच त्यांच्यावर टीका होत आहे. त्यानंतर आता अब्दुल सत्तार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणतात, ‘गाडीच्या आतून मी त्यांना सांगितले की मी बोलण्यास तयार आहे. त्यांनी मास्क देखील घातले नव्हते, हे योग्य नाही. तरी देखील पोलिसांकडून कुणाला बेकायदेशीरपणे मारहाण केली गेली असली, तर याची चौकशी केली जाईल.’ मंत्री त्या परिसरातून जाईपर्यंत सहा जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. (हेही वाचा: परभणीचे शिवसेना खासदार बंडू जाधव यांचा राजीनामा, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवले पत्र)
एएनआय ट्वीट -
सध्या राज्यात ऑनलाइन शिक्षणावर भर दिला जात असताना, कमी फीच्या मागणीसाठी एबीव्हीपीचे काही सदस्य पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या गाडीसमोर आले होते. यावर्षी शैक्षणिक फी कमीत कमी 30 टक्क्यांनी कमी आकारावी अशी त्यांची मागणी होती. सध्या बहुतेक शिक्षण ऑनलाइन सुरु आहे, विद्यार्थी महाविद्यालयात जात नाहीत, परंतु तरीही त्यांना ग्रंथालयाची फी भरावी लागत आहे. मात्र या सदस्यांना पोलिसांनी मारहाण केली. या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे की, पोलिसांचे पथक काही सदस्यांना ओढत, त्यांना बुक्क्या मारत घेऊन जात आहे.