PMC बँक प्रकरण: आरोपींना ताब्यात घेण्यासाठी ‘ईडी’ने केला विशेष न्यायालयात अर्ज

ईडीने या कर्ज घोटाळ्याप्रकरणी विशेष तपास सुरू केला आहे. तसेच राकेश वाधवान आणि सारंग वाधवान यांचा ताबा मिळावा, अशी मागणीही या अर्जामध्ये करण्यात आली आहे.

(Photo Credit: File Photo)

पंजाब अँड महाराष्ट्र बँक घोटाळ्याप्रकरणी अटक केलेल्या माजी अध्यक्ष वरियम सिंह, एचडीआयएल कंपनीचे प्रवर्तक राकेश वाधवान आणि त्यांचे चिरंजीव सारंग यांना आर्थिक गुन्हे विभागाने बुधवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने या तिघांना 23ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या सुनावणीदरम्यान सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) या तिघांना ताब्यात घेण्याची मागणी करणारा अर्ज न्यायालयात सादर केला. ईडीने या कर्ज घोटाळ्याप्रकरणी विशेष तपास सुरू केला आहे. तसेच राकेश वाधवान आणि सारंग वाधवान यांचा ताबा मिळावा, अशी मागणीही या अर्जामध्ये करण्यात आली आहे.

हेही वाचा - PMC बँक घोटाळाप्रकरणी राकेश-सारंग वधवान, वायराम सिंग यांना 23 ऑक्टोबर पर्यंत न्यायालयीन कोठडी, किला कोर्टाचा निर्णय

पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे. पीएमसी बँकेतील 4 हजार 355 कोटींचा कर्ज घोटाळा उघड झाल्यानंतर या सर्वांना अटक करण्यात आली आहे. तसेच ईडीने आतापर्यंत या प्रकरणी 3 हजार 800 कोटी रूपयांची मालमत्ता जप्त केली आहे. बुधवारी वरियम सिंह, वाधवान पिता-पुत्राला जामीन देऊ नये, या मागणीसाठी बँकेच्या खातेदारांनी न्यायालयाबाहेर घोषणाबाजी केली. तसेच रिझर्व्ह बँकेचा निषेध नोंदवत ‘आरबीआयने 3 सामान्यांचा बळी घेतला’ अशा आशयाचे फलकही झळकावले.

दरम्यान, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी खातेधारकांनी भेट घेतली. या प्रकरणी तपास करत असलेल्या आर्थिक गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त राजवर्धनही यावेळी उपस्थित होते.