PM Narendra Modi Mumbai Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी मुंबईच्या दौऱ्यावर; जिओ वर्ल्ड सेंटर येथे करणार आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सत्राचे उद्घाटन
या सत्रात कतार, जॉर्डन, मोनॅको, लक्झेंबर्ग आणि भूतानचे राष्ट्रप्रमुख, ग्रेट ब्रिटन आणि लिक्टेंस्टीनच्या राजघराण्यातील सदस्य उपस्थित असतील.
नुकत्याच पार पडलेल्या यशस्वी जी-20 कार्यक्रमानंतर आता भारतात आणखी एक आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रम होणार आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे (OIC) 141 वे सत्र 15 ते 17 ऑक्टोबर 2023 या कालावधीत मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे होणार आहे. 14 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या उपस्थितीत आयओसी सत्राचे उद्घाटन होणार आहे. आयओसी सत्र हे ऑलिम्पिक खेळांबाबत निर्णय घेणारी सर्वोच्च संस्था आहे.
क्रीडा क्षेत्राशी संबंधित देश-विदेशातील अनेक सेलिब्रिटी या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत. या सत्रात कतार, जॉर्डन, मोनॅको, लक्झेंबर्ग आणि भूतानचे राष्ट्रप्रमुख, ग्रेट ब्रिटन आणि लिक्टेंस्टीनच्या राजघराण्यातील सदस्य उपस्थित असतील. याशिवाय सात वेळा ऑलिम्पिक जलतरण पदक विजेता कर्स्टी कोव्हेंट्री, दोन वेळा ऑलिम्पिक पोल व्हॉल्ट सुवर्णपदक विजेता येलेना इसेनबायेवा, दोन वेळा ऑलिम्पिक 10,000 मीटर रौप्यपदक विजेते आणि केनियाच्या राष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष पॉल टेर्गट, ऑलिम्पिक पोल व्हॉल्ट सुवर्णपदक विजेता सर्गेई बुबका आणि ऑलिम्पिक नेमबाजी चॅम्पियन अभिनव बिंद्रादेखील सहभागी होतील. (हेही वाचा: Israel's war on Hamas: इजिप्तमधील जागतिक कॅडेट बुद्धिबळ स्पर्धेतून भारताची माघार, इस्त्रायल-हमास युद्धाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय)
फेब्रुवारी 2022 मध्ये चीनची राजधानी बीजिंगमध्ये नीता अंबानी यांच्या नेतृत्वाखाली आयओसी सत्रासाठी बोली लावण्यात आली होती. या ऐतिहासिक सभेत भारताच्या बाजूने 75 मते पडली तर विरोधात फक्त एक मत पडले. आयओसीचे हे अधिवेशन 40 वर्षांनंतर दुसऱ्यांदा भारतात होत असल्याने ही बैठक किती महत्त्वाची आहे, याचा अंदाज येतो. या सत्रामुळे खेळांशी संबंधित विविध भागधारकांमध्ये संवाद आणि ज्ञानाची देवाणघेवाण करण्याची संधी मिळेल. यापूर्वी 1983 मध्ये नवी दिल्ली येथे आयओसीचे 86 वे सत्र आयोजित करण्यात आले होते.