Pink Rickshaw: राज्यातील 'या' महत्त्वाच्या शहरात सुरु होणार ‘पिंक रिक्षा’ योजना; महिलांना उपलब्ध होणार रोजगाराच्या संधी
रिक्षातून प्रवास करताना महिलांचा छळ आणि गैरवर्तन होऊ नये यासाठी भारत सरकारने हा उपक्रम हाती घेतला आहे.
महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात तसेच सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी राज्यातील महत्त्वाच्या शहरात ‘पिंक रिक्षा’ (Pink Rickshaw) ही योजना लवकरच सुरू करणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. मंत्रालयातील दालनात महिला व बालविकास विभागाच्या योजनांचा आढावा घेताना मंत्री तटकरे बोलत होत्या. मंत्री तटकरे म्हणाल्या की, ही योजना परिपूर्ण करावी. यामध्ये लाभार्थी निवड, ई-रिक्षाला प्राधान्य देणे, बँका निवड तसेच प्रशिक्षण या सर्व बाबी तपासून घ्याव्यात.
राज्यातील महत्त्वाच्या शहरांमध्ये ही योजना सूरू करणार असून प्रायोगिक तत्त्वावर मुंबई, नवी मुंबई, पनवेल, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर व ठाणे या ठिकाणी ही सुरू करण्याचा मानस आहे.
गुलाबी रिक्षा या भारतातील काही शहरांमध्ये महिला प्रवाशांसाठी सामान्य ऑटो रिक्षाला पर्याय आहे. रिक्षातून प्रवास करताना महिलांचा छळ आणि गैरवर्तन होऊ नये यासाठी भारत सरकारने हा उपक्रम हाती घेतला आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी पॅनिक बटणे आणि जीपीएस ट्रॅकिंग सिस्टीम यासारखी विशेष फीचर्स यामध्ये बसविण्यात आली आहेत.
गुलाबी रिक्षा एकतर पूर्णपणे गुलाबी रिक्षा असतात किंवा त्यांचे छत गुलाबी रंगाचे असते. लैंगिक अत्याचार आणि बलात्कारांपासून महिलांचे संरक्षण करण्यासाठी भारत सरकारने रांचीमध्ये पहिल्यांदा गुलाबी रिक्षा 2013 ला सुरू केली होती. कालांतराने त्या भारतातील इतर अनेक शहरांमध्ये सादर करण्यात आल्या. कायदेशीर पडताळणी आणि कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर प्रशिक्षित व्यावसायिक, मुख्यत्वे महिला या ऑटो चालवतात. (हेही वाचा: Uddhav Thackeray on Eknath Shinde: पंचतारांकीत शेती राज्यातील सर्व शेतकऱ्यांना मिळावी; उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला)
दरम्यान, महिलांना सॅनिटरी पॅड पुरविण्यासाठी शासनाच्या सर्व विभागांशी समन्वय साधून गरजू लाभार्थी निवड निकष तपासून ही देखील योजना यशस्वीपणे राज्यात राबवावी. महिला व बालविकास विभागाने शाळा, महाविद्यालये, गरीब व गरजू लाभार्थी महिला निवड यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करून शेवटच्या घटकातील महिलांना सॅनिटरी नॅपकिन्स पुरविण्याबाबत चोखपणे योजना राबवावी, अशा सूचना मंत्री तटकरे यांनी दिल्या.