धक्कादायक! नाशिक महापालिकेत चक्क डुक्कर घोटाळा; अधिकाऱ्यांनी केला लाखो रुपयांचा भ्रष्टाचार, चौकशीचे आदेश
मात्र नाशिकमध्ये (Nashik) चक्क ‘डुक्कर घोटाळा’ (Pig Scam) उघडकीस आला आहे. या प्रकरणी पालिका आयुक्तांनी कडक कारवाई करत चौकशीचे आदेश दिले आहेत.
सध्या कोणत्या क्षेत्रात भ्रष्टाचार (Corruption) होईल हे काही सांगता येणार नाही. बँकेचे घोटाळे, विविध प्रकल्पांमध्ये होणारे घोटाळे आपण ऐकले असतील. मात्र नाशिकमध्ये (Nashik) चक्क ‘डुक्कर घोटाळा’ (Pig Scam) उघडकीस आला आहे. या प्रकरणी पालिका आयुक्तांनी कडक कारवाई करत चौकशीचे आदेश दिले आहेत. शहरात फिरणाऱ्या डुकरांमुळे होणारी अस्वच्छता कमी होण्यासाठी, डुकरे पकडण्याचे आदेश दिले होते यामध्ये हा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. न्यूज 18 ने याबाबत वृत्त दिले आहे.
'स्वच्छ भारत अभियान कार्यक्रम’ अंतर्गत नाशिक महापालिका क्षेत्रातील मोकाट डुकरे पकडणे व लिलाव पद्धतीने त्यांची विल्हेवाट लावणे, यासाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या. आलेल्या निविदांवर विचारविनिमय करत हे कंत्राट एका ठेकेदाराला देण्यात आले. त्यानंतर ही डुकरे पकडण्यासाठी एक नियम लागू करण्यात आला. ‘दोनशे डुकरे न पकडल्यास 5000 दंड’. त्यानंतर या कंत्राटदाराने 200 डुकरे पकडली नाहीत असे दाखवले. त्याची 5000 रुपये दंडाची रक्कम भरून, जितकी डुकरे पकडली आहेत त्या बिलाच्या नावाखाली, पालिकेकडून एक लाख 10 हजारप्रमाणे तब्बल 9 लाखाहून अधिक रकमेची बिले काढली.
(हेही वाचा: या चार चोऱ्यांनी एकेकाळी हादरला होता संपूर्ण देश; विकला होता ताज महल, लाल किल्ला आणि संसद भवन)
मात्र इतक्या मोठ्या रकमेचा घोटाळा झाला असल्याने ही गोष्ट पदाधिकाऱ्यांच्या ध्यानात आली. आयुक्तांकडे या गोष्टीची तक्रार केल्यानंतर आता या घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश दिले गेले आहेत. याआधीही नाशिक महापालिकेत 'स्वच्छ भारत अभियान' अंतर्गतच कचरापेटी घोटाळा देखील समोर आला होता. दरम्यान शहरातील डुकरांची संख्या कामालीची वाढत आहे. मोकाट फिरणाऱ्या डुकरांचा नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. याबाबत पहिल्यांदाच एक प्रकल्प राबवण्यात आला त्यातही घोटाळा झाल्याचे पाहून नागरिक संतप्त झाले आहेत.