Maharashtra Petrol & Diesel Prices: खुशखबर! महाराष्ट्रात पेट्रोल व डिझेलच्या किंमती झाल्या कमी; सरकारने VAT मध्ये केली कपात

या निर्णयानंतर देशात पेट्रोल साडेनऊ रुपयांनी तर डिझेल सात रुपयांनी स्वस्त झाले आहे. आता महाराष्ट्र सरकारनेही दर कमी करण्याची घोषणा केली असून, त्यामुळे महाराष्ट्रातील दर आणखी कमी होणार आहेत

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

काल केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कात (Excise Duty on Petrol and Diesel) कपात केली. यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी राज्यांनाही उत्पादन शुल्कात कपात करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर आता या निर्णयानंतर दुसऱ्याच दिवशी शिवसेनेच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने आजपासून पेट्रोलवरील व्हॅटमध्ये 2.08 रुपये आणि डिझेलवर 1.44 रुपयांची कपात केली. व्हॅटमध्ये कपात केल्यामुळे राज्य सरकारला महिन्याला पेट्रोलवर 80 कोटी रुपये आणि डिझेलवर 125 कोटी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. सरकारला वार्षिक 2,500 कोटी रुपयांचा महसूल तोटा सहन करावा लागणार आहे.

केंद्र सरकारने शनिवारी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करण्याची घोषणा केली. या निर्णयानंतर देशात पेट्रोल साडेनऊ रुपयांनी तर डिझेल सात रुपयांनी स्वस्त झाले आहे. आता महाराष्ट्र सरकारनेही दर कमी करण्याची घोषणा केली असून, त्यामुळे महाराष्ट्रातील दर आणखी कमी होणार आहेत. व्हॅट कमी करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यानंतर मुंबईत पेट्रोल 109 रुपये 27 पैसे प्रतिलिटर दराने उपलब्ध होणार आहे, तर डिझेल प्रति लिटर 95 रुपये 84 पैसे मिळणार आहे. (हेही वाचा: पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती होणार कमी; केंद्राकडून उत्पादन शुल्कात कपात, गॅस सिलिंडरवर 200 रुपये सबसिडी जाहीर)

मुख्यमंत्री कार्यालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, 16 जून 2020 आणि 4 नोव्हेंबर 2021 दरम्यान केंद्र पेट्रोलवर प्रति लिटर 7.69 रुपये आणि डिझेलवर 15.14 रुपये प्रति लिटर उत्पादन शुल्क आकारत आहे. मार्च ते मे 2020 दरम्यान केंद्राने पेट्रोलवर 13 रुपये आणि डिझेलवर 16 रुपये प्रति लिटर उत्पादन शुल्क वाढवले होते. राज्य सरकारने वार्षिक अर्थसंकल्पात 2022-23 मध्ये वाहन इंधनावरील व्हॅटद्वारे सुमारे 44,000 कोटी रुपये प्राप्त होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

दरम्यान, कालच्या केंद्राच्या निर्णयावर पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी कर आणखी कमी करावयास हवे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. केंद्र सरकारने दोन महिन्यांपूर्वी पेट्रोलवरचा अबकारी कर प्रति लिटर 18.42 रुपये इतका वाढविला होता आणि तो 8 रुपयांनी कमी केल्याची घोषणा केली. डिझेलवरील अबकारी करदेखील 18.24 रुपयांनी वाढविले आणि आता 6 रुपयांनी कमी केल्याची घोषणा केली आहे. आधी किंमती भरमसाठ वाढवायच्या आणि नंतर नाममात्र कमी करून दर कमी केल्याचा आव आणायचा हे बरोबर नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.