कोरोना विषाणूबाबत बॉम्बे हायकोर्टात याचिका दाखल; BCOM परीक्षेबाबत कोर्टाने मुंबई विद्यापीठाला बजावली नोटीस

कोरोनाच्या प्रादुर्भावाखाली सुरू असलेल्या पदवी आणि पदव्युत्तर परीक्षांबाबत, हायकोर्टाने

मुंबई उच्च न्यायालय (Photo credit : Youtube)

एकीकडे राज्यात कोरोना विषाणूचे (Corona Virus) संकट थैमान घालत आहे, तर दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या परीक्षा (Exams) जशाच तशा चालू आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावाखाली सुरू असलेल्या पदवी आणि पदव्युत्तर परीक्षांबाबत, हायकोर्टाने (Bombay High Court) सोमवारी मुंबई विद्यापीठाकडे (University of Mumbai) जाब विचारला. सागर जोंधळे यांनी याबाबत याचिका दाखल केली होती. जोंधळे यांच्या वकिलांनी कार्यवाहक सरन्यायाधीश बी.पी. धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती एन.आर. बोरकर यांच्या खंडपीठाला सांगितले की, राज्य सरकारने 14 मार्च रोजी एक अधिसूचना जारी केली होती आणि त्याद्वारे 31 मार्चपर्यंत सर्व महाविद्यालये व शाळा बंद ठेवण्याचे निर्देश दिले होते.

यामध्ये सरकारने ठरलेल्या तारखेनुसार दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्यास परवानगी दिली होती. अशात मुंबई विद्यापीठाची बी कॉमच्या सेमिस्टर 6 ची परीक्षा  ठरलेल्या वेळेनुसार 23 मार्चपासून सुरू होत आहे. तसेच अनेक ठिकाणी सरकारच्या निर्णयाचे पालन होत नाही. याचबाबत ही याचिका दाखल करण्यात आली होती. जोंधळे यांचे वकील मिलिंद देशमुख यांनी सोमवारी कोर्टाला सांगितले की, विद्यापीठाच्या परीक्षा 23 मार्चपासून सुरू होणार आहेत, त्यात अनेक लाख विद्यार्थ्यांचा समावेश असेल. या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

जोंधळे यांच्या याचिकेत म्हटले आहे की, ‘या परीक्षांमध्ये उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी मुंबई विद्यापीठाने घ्यावी. या याचिकेमागची खरी चिंता विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेविषयी आहे’. खंडपीठाने विद्यापीठाला या याचिकेला उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. आता याप्रकरणी पुढील सुनावणी मंगळवारी पार पडेल. (हेही वाचा: Coronavirus च्या धोक्यामुळे महापालिका आणि पंचायत समितीच्या निवडणुका 3 महिन्यांसाठी पुढे ढकलल्या- राजेश टोपे)

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी वकील मिलिंद देशमुख यांनी 17 सूचनांची यादी सोपवली आहे. या सूचनांमध्ये काही कालावधीसाठी शाळा व महाविद्यालये बंद करण्याचा समावेश होता. दरम्यान, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वच स्तरांवर तयारी सुरू आहे. यासाठी राज्य सरकारने पालिका, नगरपालिका, नगर पंचायत क्षेत्रातील सर्व शासकीय कार्यालये व खासगी शाळा व महाविद्यालये 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याशिवाय, नागपूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पिंपरी-चिंचवड, पुणे या सहा शहरांचे जिम, जलतरण तलाव, सिनेमा थिएटर 31 मार्चपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय सर्व शैक्षणिक, धार्मिक, क्रीडा, राजकीय कार्यक्रमांची परवानगी मागे घेण्यात आली आहे.