पंढरपूर वारी 2020: देहू, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त आणि पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्यात चर्चा; यंदाच्या पालखी सोहळयाचे नियोजन, स्वरूप येत्या 2 दिवसांत ठरणार
दरम्यान देहू, आळंदी पालखी सोहळयाचे नियोजन, स्वरूप कसे असेल याबाबत येत्या दोन दिवसात निर्णय घेण्यात येणार आहे.
वारकरी संप्रदयासाठी आषाढी वारी ही अत्यंत महत्त्वाची असते. त्यामागे वर्षानुवर्षांची परंपरा आहे. पण यंदा कोरोना व्हायरस संकटामुळे या वारीबद्दल भाविकांमध्ये अनिश्चिता आहे. दरम्यान भारतामध्ये कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळे संचारबंदीचे नियम कडक असताना संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांसह अन्य पालखी सोहळा कसा रंगणार? याबाबत चर्चा करण्यासाठी देहू व आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त पुणे जिल्हाधिकार्यांच्या कार्यालयात आले होते. आज पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि वारकरी मंडळींमध्ये चर्चा झाली. दरम्यान देहू, आळंदी पालखी सोहळयाचे नियोजन, स्वरूप कसे असेल याबाबत येत्या दोन दिवसात निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती यावेळेस नवल किशोर राम यांनी दिली आहे.
दरम्यान कोरोना लॉकडाऊनची परिस्थिती पाहता यंदा पालखी सोहळ्यात, आषाढी वारीमध्ये मोजकेच लोकं घेऊन वारीचा पंढरपूरमध्ये दाखल केली जाऊ शकते का? यावर सध्या चर्चा आहे. दरम्यान कोरोना संकटाच्या काळातही वारीची परंपरा कायम ठेवली जाईल असा विश्वास देवस्थानच्या प्रमुख विश्वस्तांनी यापूर्वीच व्यक्त केला आहे. काही दिवसांपूर्वी वारकर्यांमध्ये व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून यावर चर्चा करण्यात आली आहे.
देहू व आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त आणि पुण्याचे जिल्हाधिकारी श्री नवल किशोर राम
यंदा आषाढी एकादशीचा सोहळा 1 जुलै दिवशी आहे. दरवर्षी वारकरी मजल- दरमजल करत पुणे, आळंदी येथून पंढरपुरात दाखल होतात. मात्र महाराष्ट्रात 2 महिन्यांपासून सुरू असलेल्या कोरोना व्हायरस संकटामध्ये सारी प्रार्थनास्थळं बंद ठेवण्याचा निर्णय झाला आहे. यामध्ये पंढरपूरच्या विठ्ठल रूक्मिणी मंदिराचादेखील समावेश आहे.