पंढरपूर आषाढी वारी 2020 वर यंदा कोरोनाचं सावट? पालखी सोहळयांचे प्रमुख राज्य सरकार सोबत करणार चर्चा

कोरोना व्हायरस संकटात सुवर्णमध्य काढत यंदा वारीची परंपरा कायम ठेवली जाईल असा विश्वास व्यक्त करताना लवकरच राज्य सरकार सोबत पालखी सोहळ्याचे प्रमुख चर्चा करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

पंढरपूर वारी 2020 (Photo courtesy: archived, edited, representative image)

महाराष्ट्राच्या विविध भागातून दरवर्षी आषाढी वारीला पंढरपुरात विठ्ठल रूक्मिणीचं दर्शन घेण्यासाठी वैष्णवांचा मेळा जमतो. मात्र यंदा पंढरपुरच्या या आषाढी वारीवर कोरोना व्हायरसचं संकट घोंघावत आहे. दरम्यान आज सकाळी व्हिडिओ कॉन्फरस द्वारा संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानाच्या प्रमुखांची सर्व प्रमुख संतांच्या पालखी सोहळा समन्वयकांशी बैठक झाली. यामधून यंदा आषाढीची परंपरा कायम ठेवत माऊलींचा पालखी सोहळा निघणार असल्याचा विश्वास माऊली पालखी सोहळ्याचे मानकरी ह.भ.प. देवव्रत वासकर महाराज यांनी व्यक्त केल्याची माहिती लोकसत्ता च्या रिपोर्ट मधून समोर आली आहे. दरम्यान कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरच्या विठ्ठल - रूक्मिणी मंदिरासह सारी प्रार्थनास्थळ बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे यंदा वारीचं काय होणार? हा प्रश्न भाविकांच्या मनात आहे. परंतू काही सुवर्णमध्य काढत यंदा वारीची परंपरा कायम ठेवली जाईल असा विश्वास व्यक्त करताना लवकरच राज्य सरकार सोबत त्याबाबत चर्चा करणार असल्याचं वृत्त आता समोर आलं आहे.

दरम्यान आषाढी एकादशीच्या दीड-दोन महिने आधीपासूनच वारी आणि पालखी सोहळ्याला सुरूवात होते. यंदा आषाढी एकादशी 1 जुलै 2020 दिवशी आहे. त्यामुळे आता वारी आणि पालखी साठी तयारी सुरू झाली आहे. परंतू देशासह महाराष्ट्रात संचारबंदी असल्याने वारी निघणार कशी हा प्रश्न उभा ठाकला आहे. पुणे शहर रेड झोन मध्ये असल्याने अनेक पालख्या या भागातून जातात त्यामुळे कोरोना व्हायरस लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर आता काही बदल होऊ शकतो का? याची चाचपणी केली जात आहे.

मीडिया रिपोर्ट नुसार, आता माऊलीचा पालखी सोहळा पुणे ऐवजी सासवड मार्गे पंढरपूरात नेण्याचा विचार आहे. तसेच यंदा पालखी सोहळ्यात सहभागी व्यक्तींच्या संख्येवर देखील मर्यादा घालण्याच्या पर्यायावर विचार केला जाऊ शकतो.

यंदा कोरोना व्हायरस संकटामुळे गुढी पाडवा, अक्षय्य तृतीया या सणांसोबतच अनेक मानाचे महोत्सव, जत्रा रद्द करण्यात आल्या आहेत. सध्या महाराष्ट्रातील 36 पैकी 34 जिल्ह्यांमध्ये कोरोनाने शिरकाव केल्याने परिस्थिती बिकट झाली आहे.