पंढरपूरच्या विठ्ठलाचे मंदिर धोक्यात; पुरातत्व खाते करणार पाहणी
गेले कित्येक वर्षे ऊन, वार, पाऊस यांचा तडाखा खात तसेच उभे आहे. त्यामुळे मंदिरात अनेक नवी बांधकामे केली गेली
Pandharpur : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठलाचे मंदिर (Vitthal Temple) धोक्यात आले आहे. गेले कित्येक वर्षे ऊन, वार, पाऊस यांचा तडाखा खात तसेच उभे आहे. त्यामुळे मंदिरात अनेक नवी बांधकामे केली गेली, अनेक नवे बदल केले गेले. मात्र आता या नवीन बांधकामामुळे मूळ मंदिरालाच धोका पोहोचणार आहे. त्यामुळे आता ही सर्व बांधकामे हटवून, गाभाऱ्यामध्ये काही नवे बदल केल्यानंतरच हा धोका कमी होऊ शकतो असे पुरातत्वखात्याने सांगितले आहे.
विठ्ठल मंदिरात होणारी गर्दी पाहता, मंदिरात काही बदल केले गेले. मंदिराच्या छतावर स्लॅब टाकले गेले, तसेच इतर अनेक अवास्तव बांधकामे घडली. मात्र यामुळे मूळ मंदिरावरचा बोझा वाढला आहे. मूळ मंदिर वास्तूस धोका निर्माण झाल्याचे पुरातत्व विभागाचे म्हणणे आहे. आता पुरातत्व विभाग संपूर्ण मंदिराचे नव्याने ऑडिट करणार आहे. यामध्ये मंदिराच्या बांधकामाची संपूर्ण तपासणी केली जाईल. त्यानंतर आलेल्या अहवालानुसार मंदिरात पुन्हा बदल घडतील. राज्य पुरातत्व विभागाचे औरंगाबाद येथील सहाय्यक संचालक विलास वहाणे आणि त्यांच्या टीमने आज विठ्ठल मंदिराची पाहणी केली. (हेही वाचा : विठुमाऊलीच्या ऑनलाईन दर्शनासाठी भाविकांना 100 रुपये मोजावे लागणार)
मूळ मंदिराचे बांधकाम संपूर्ण दगडी पद्धतीने झाले असून, ते यादवकालीन साधर्म्याचे असल्याचे अनेक शिल्पकलेवरून दिसून येते. त्यानंतर मंदिराच्या शिखराचे बांधकाम झाले, आता मंदिरावर स्लॅब टाकले. हवा खेळती राहण्यासाठी मूळ बांधकामातील दगड काढून टाकले. सुधारणेच्या नावाखाली इतर अनेक छोटे मोठे बदल केले गेले. मात्र त्यामुळे मूळ मंदिराचे बांधकाम कमकुवत होत आहे. ते त्वरीत बदलणे गरजेचे असल्याचे पुरातत्वखात्याचे म्हणणे आहे.