Pandharpur by-Election 2021: अजित पवार यांची सभा, आयोजकांवर गुन्हा

या सभेला मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. याच सभेवरुन आयोजक श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्यावर आता कलम 188 आणि 269 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ajit Pawar (Photo Credit: Twitter)

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी (Pandharpur by-Election 2021) प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरु आहे. कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्गाची भीती असतानाही मोठ्या प्रमाणावर सभा घेतल्या जात असून गर्दीही तितकीच तोबा तोबा होत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत अशीच एक सभा पंढरपूर (Pandharpur ) येथे पार पडली. या सभेला मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. याच सभेवरुन आयोजक श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्यावर आता कलम 188 आणि 269 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरोना व्हायरस संसर्गाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे राज्यातील प्रत्येक नागरिकाने खबरदारी घेणे आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारे गर्दी टाळा. सोशल डिस्टन्सींग पाळा. मास्क लावा. अन्यथा कायदेशीर कारवाई कठोर पद्धतीने करण्यात येईल, असे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. असे असतानाही पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मोठ्या प्रामणात सभा घेण्यात आली. या सभेला मोठी गर्दी झाली. यावरुन विरोधकांनीही मोठ्या प्रमाणात टीका केली. या गर्दीवरुन जोरदार राजकारण सुरु झाले. (हेही वाचा, Kalyanrao Kale joins NCP: कल्याणराव काळे यांचा अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश)

अजित पवार यांच्या सभेला जमलेली गर्दी पाहून टीका करताना विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी म्हटले की, राज्याचे उपमुख्यमंत्रीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश पाळत नाहीत. राज्य सरकारमध्ये कोणताही पायपोस नाही. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या अवाहनाला त्यांच्याच मंत्रिमंडळातील मंत्री प्रतिसाद देताना दिसत नाहीत.

दुसऱ्या बाजूला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले की, खरे म्हणजे जो चूक करतो कायदा मोडतो त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा. परंतू, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात ती हिंमत नाही. ते अजित पवार यांच्यावर कारवाई करु शकत नाहीत. जर कोणी कायदा मोडला तर तो व्यक्ती कोणीही असला तरी त्याच्यावर गुन्हा दाखल करायला हवा. मग ते अजित पवार असोत चंद्रकांत पाटील असोत किंवा देवेंद्र फडणवीस असोत. कायदा सर्वांना सारखाच असतो. अजित पवार हे कोण आहेत? उपमुख्यमंत्री असले तरी तेही सर्वसामान्य नागरिकच आहेत. परंतू, असे असले तरी उद्धव ठाकरे त्यांच्यावर कारवाई करणार नाहीत. त्यांच्यावर ती हिंमत नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.