Palghar Mob Lynching: पालघर तिहेरी हत्याकांड प्रकरणी जिल्ह्याचे एसपी गौरव सिंह सक्तीच्या रजेवर; गृहमंत्री अनिल देशमुख यांचा निर्णय
यामध्ये जूना अखाड्यातील दोन साधूंसह ड्रायव्हरचा मृत्यू झाला होता
पालघर (Palghar) येथील, गडचिंचळे भागात काही दिवसांपूर्वी आदिवासींच्या एका टोळीने (Tribal Mob) चोर असल्याच्या संशयावरून, चालकासह तीन व्यक्तींना मारहाण केली होती. यामध्ये जूना अखाड्यातील दोन साधूंसह ड्रायव्हरचा मृत्यू झाला होता. आता या प्रकरणी पालघर जिल्ह्याचे एसपी गौरव सिंह (SP Gaurav Singh) यांना सक्तीच्या रजेवर (Compulsory Leave) पाठविण्यात येणार असल्याची माहिती, महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख (Home Minister Anil Deshmukh) यांनी दिली आहे. आज राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अचानक घटनास्थळाला भेट दिली आणि प्रकरणाचा आढावा घेतला तसेच त्यांनी संपूर्ण घटनेचा घटनाक्रमही समजून घेतला.
पीटीआय ट्विट -
पालघरच्या डहाणू तालुक्यातील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोर असल्याच्या संशयाने, ग्रामस्थांनी तिघांची हत्या केल्याची घटना 16 एप्रिल रोजी घडली होती. या घटनेनंतर प्रकरणाचा व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाले होते. या घटनेमुळे महाराष्ट्रातील राजकारण बरेच तापले होते. विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र सरकार व राज्याच्या गृहमंत्र्यांवर कडाडून टीकाही केली होती. याप्रकरणी कासा पोलीसांनी 115 आरोपींना अटक केली होती. आता गृहमंत्र्यांनी जिल्ह्यातील एसपी गौरव सिंह यांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे व सिंह यांचा पदभार अप्पर पोलीस अधीक्षक यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. (हेही वाचा: Palghar: पालघर येथे आदिवासी जमावाने चोर समजून केलेल्या मारहाणीत तीन जणांचा मृत्यू; मरण पावलेल्यांमध्ये दोन साधूंचा समावेश)
पालघर मॉब लिंचिंग प्रकरणाचा तपास NIA कडे देण्यासंदर्भात बॉम्बे हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. तत्पूर्वी या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सीआयडी (CID) कडे सोपविला आहे. भाजपने सुद्धा पालघर प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर पालघर मॉब लिंचिंग प्रकरणामागे कोणतेही धार्मिक कारण नाही असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले होते.