Osho Ashram News: ओशो आश्रम भूखंड विक्री परवानगीस सह धर्मादाय आयुक्तांचा नकार, 107 कोटींचा व्यवहार स्थगित
उद्योगपती राहुल बजाज यांनी या भूखंडासाठी सर्वाधिक रकमेची बोली लावली होती.
पुणे येथील ओशो आश्रम (Osho Ashram) परिसरातील भूखंड विक्रीस सह धर्मदाय आयुक्तांनी परवानगी नाकारल्याने जवळपास 107 कोटी रुपयांचा व्यवहार स्थगित झाला आहे. हा भूखंड विकत घेण्यासाठी राजीव बजाज (Rajiv Bajaj) यांनी सर्वाधिक बोली लावली होती. मात्र, ओशोंचे शिष्य असलेल्या एका गटाने याला तीव्र विरोध केल्याने आयुक्तांनी हा निर्णय घेतला. ओशो आश्रम (Osho International Foundation) नेहमीच चर्चेत असतो. या वेळी तो भूखंडाच्या विक्रीवरुन चर्चेत होता.
कोरेगाव पार्क परिसरात ओशो आश्रम
पुणे येथील कोरेगाव पार्क परिसरात ओशो आश्रम आहे. या आश्रमाच्या मालकीची काही मालमत्ता आहे. ज्यामध्ये भूखंडांचाही समावेश आहे. यापैकी दोन भूखंड विकण्यासाठी ओशो इंटरनॅशनल मेडिटेशन रिसॉर्ट चालवणाऱ्या ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशन (ओआयएफ) द्वारा अर्ज दाखल करण्यात आला होता. हा अर्ज मुंबईतील सह धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे दाखल करण्यात आला होता. मात्र, ओशो शिष्यांच्या एका गटाने याला तीव्र विरोध केल्याने ही परवानगी नाकारण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. या व्यवहारासाठी सर्वाधिक 107 कोटींची बोली लागली होती. (हेही वाचा, Osho Ashram Pune: ओशो आश्रम परिसरात पुणे पोलिसांकडून अनुयायांवर लाठीमार, काही जण ताब्यात)
काय आहे प्रकरण?
पुण्यातील आश्रम चालवणाऱ्या ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशनकडे असलेल्या जवळपास 9,800 चौरस मीटरचे दोन भूखंड खरेदीसाठी विक्री करण्याचा फाऊंडेशनचा विचार होता. हे भुखंड ड उद्योगपती राहुल बजाज यांच्या कुटुंबाशी संबंधीत ट्रस्टला 107 कोटी रुपयांना विकण्यासाठी फाऊंडेशनमधील काहींचा विचार होता. ज्यासाठी धर्मदाय आयुक्तांकडे परवानगी मागितली गेली. मात्र, ओशोंचे शिष्य असलेल्या एका गटाकडून याला तीव्र विरोध झाला. तसेच, या गटाने ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशनच्या विश्वस्तांवर गंभीर आरोपही केले होते. (हेही वाचा, कोण आहेत 'मा आनंद शीला'? 'या' भूमिकेतून झळकणार प्रियांका चोप्रा)
सह धर्मदाय आयुक्त आर यू मालवणकर यांच्याकडून आदेश पारीत
दरम्यान, सर्व बाबी विचारात घेता सह धर्मदाय आयुक्त आर यू मालवणकर यांनी 7 डिसेंबर रोजी आदेश पारीत केला. ज्यामध्ये आश्रमाचा भूखंड विक्री करण्यास परवानगी नाकारण्यात आली. तसेच, "राजीवनयन राहुलकुमार बजाज आणि ऋषभ फॅमिली ट्रस्टकडून मिळालेली 50 कोटी रुपयांची रक्कम व्याजाशिवाय परत करण्याचे निर्देश देखील आयुक्तांनी ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशनला आपल्या आदशात दिले. इंडियन एक्सप्रेसने याबाबत वृत्त दिले आहे.
ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशन हा जगभरातील नागरिक आणि अभ्यासकांच्या आकर्षणाचा विषय आहे. त्यामुळे देशच नव्हे तर जगभरातून लोक या आश्रमास भेट देतात. या आश्रमात दीड-दीड एकराचे दोन भूखंड आहेत. ज्याच्या शेजारी राजीव बजाज यांचा बंगला आहे. या जागेसाठी त्यांनी बोली लावली होती. त्यासाठी 107 कोटी रुपये देण्याची त्यांची तयारीही होती. मात्र, धर्मदाय आयुक्तांच्या निर्णयामुळे अनेकांची आपेक्षा पूर्ण होऊ शकली नाही.