Operation Deep Manifest: पाकिस्तानमधून बेकायदेशीर माल आयात प्रकरण उघड, DRI ने Nhava Sheva बंदरावर Rs 9 कोटींचा माल जप्त केला
डीआरआयने ऑपरेशन डीप मॅनिफेस्ट अंतर्गत न्हावा शेवा बंदरावर 9 कोटी रुपयांचा 1,115 मेट्रिक टन पाकिस्तानी माल जप्त केला. प्राथमिक माहितीनुसार, आयातदाराने पाकिस्तानी मूळ वस्तूंवर भारताच्या बंदीचे उल्लंघन केले आणि ते UAE मार्गे नेले गेले.
बेकायदेशीर आयातीवरील मोठ्या कारवाईत, महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) नवी मुंबईतील न्हावा शेवा (Nhava Sheva बंदरात 1,115 मेट्रिक टन पाकिस्तानी मूळचा माल (Pakistani Goods Smuggling) वाहून नेणारे 39 कंटेनर जप्त केले आहेत, ज्याची किंमत अंदाजे 9 कोटी रुपये आहे, असे अर्थ मंत्रालयाने गुरुवारी (26 जून) जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. ऑपरेशन डीप मॅनिफेस्ट (Operation Deep Manifest) अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. ही आयात दुबई, UAE मार्गे तृतीय देशांचा वापर करून भारतात आणण्यात येत होती आणि ती सरकारच्या आयात धोरणाविरोधात आणि पाकिस्तानसंबंधित बंदी आदेशांच्या स्पष्ट उल्लंघनात होती.
बनावट कागदपत्रांद्वारे सरकारची फसवणूक
नाव्हा शेवा बंदरावर पकडलेल्या मलाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे असे की, पाहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, भारत सरकारने पाकिस्तानमधून होणाऱ्या थेट किंवा अप्रत्यक्ष आयात आणि ट्रान्झिटवर पूर्ण बंदी 2 मे 2025 पासून लागू केली आहे. या आधी अशा वस्तूंवर 200 टक्के सीमा शुल्क लावण्यात येत होते. दरम्यान, काही आयातदारांनी मालाचा मूळ देश चुकीचा दाखवून आणि शिपिंग कागदपत्रे बनावट करून सरकारच्या धोरणाची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. मंत्रालयाच्या माहितीनुसार, हा माल मूळचा दुबई येथील असल्याचे खोटेच भासवण्यात आले. पण, प्रत्यक्षात या वस्तू पाकिस्तानमधून आयात करण्यात आल्या होत्या, असे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. (हेही वाचा, Mumbai Nhava Sheva Port: न्हावा शेवा बंदरात मोठ्या प्रमाणात तस्करी केलेले इलेक्ट्रॉनिक्स जप्त; SIIB ची मोठी कारवाई)
माल पाकिस्तानचा, दुबईमार्गे भारतात
जलवाहतुकीद्वारे केला जाणारा हा बेकायदेशीर माल कराची बंदरातून दुबईच्या जाबेल अली बंदरावर हलवला जात होता आणि तेथून दुसऱ्या कंटेनरमध्ये टाकून भारतीय बंदरांकडे पाठवला जात होता, अशी माहिती तपासात उघड झाली आहे. तपासादरम्यान पाकिस्तानशी संबंधित आर्थिक व्यवहार आणि धनवहनाच्या साखळ्या सुद्धा समोर आल्या असून, त्यातून अनधिकृत आर्थिक प्रवाहांबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणात आयात करणाऱ्या कंपनीच्या एका भागीदाराला अटक करण्यात आली असून, तपास सुरू आहे. मंत्रालयाने सांगितले की, ही संपूर्ण यंत्रणा पाकिस्तानी आणि यूएई नागरिकांच्या गुंतवणुकीने आखण्यात आली होती, ज्यामध्ये व्यापक आर्थिक व्यवहारांचे जाळे उभे करून वस्तूंचा मूळ स्रोत लपवण्याचा प्रयत्न केला गेला. ही कारवाई ऑपरेशन सिंदुरच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली असून, सध्या देशभरात सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे. याअंतर्गत DRI कडून डेटा विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे विशेष निरीक्षण मोहीम सुरू करण्यात आली आहे. सरकारी यंत्रणा सध्या या प्रकरणामागील आर्थिक आणि लॉजिस्टिक नेटवर्कचा तपास करत असून, हे प्रकरण केवळ व्यापार धोरणाचाच नाही तर राष्ट्रीय सुरक्षेचाही गंभीर प्रश्न असल्याचे स्पष्ट होत आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)