Only Non-Maharashtrian: मुंबईमधील 'Arya Gold' ने प्रसिद्ध केली केवळ 'अमराठी' लोक हवे असणारी नोकरीची जाहिरात; सोशल मिडियावर कडाडून विरोध, Sushma Andhare यांची शिंदे सरकारवर टीका

उमेदवारांना पाच वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. मात्र नोकरीच्या पदासाठी उमेदवार ‘अमराठी’ असणे आवश्यक असल्याचे जाहिरातीमध्ये नमूद केले आहे.

Arya Gold Job Advertisement

महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये मराठी लोकांना नोकरी नाकारण्यात आल्याची धक्कादायाब बाब समोर आली आहे. मुंबईतील अंधेरी पूर्व परिसरातील मरोळ नाका येथील आर्या गोल्ड (Arya Gold) या खाजगी संस्थेने, उत्पादन व्यवस्थापक पदासाठी केवळ ‘गैर-महाराष्ट्रीयन’ अर्जदारांची मागणी करणारी नोकरीची जाहिरात पोस्ट केली आहे. यामुळे गुरुवारी नव्या वादाला तोंड फुटले. या वादग्रस्त निकषामुळे संस्थेविरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे. इनडीड (Indeed) या नोकरीच्या वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या जाहिरातीमध्ये, आर्य गोल्डच्या डायमंड फॅक्टरीत प्रोडक्शन मॅनेजरची जागा भरायची आहे.

या पदावर पूर्णवेळ दिवसाच्या शिफ्टसह दरमहा ₹25,000 ते ₹62,760 पर्यंत पगार मिळू शकेल. उमेदवारांना पाच वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. मात्र नोकरीच्या पदासाठी उमेदवार ‘अमराठी’ असणे आवश्यक असल्याचे जाहिरातीमध्ये नमूद केले आहे.

ही जाहिरात समोर आल्यानंतर सोशल मिडीयावर आर्या गोल्डवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. याबाबत शिवसेना (UBT) नेत्या सुषमा अंधारे यांनी त्यांच्या एक्सवरील पोस्टमध्ये शिंदे सरकारवर टीका केली. विद्यमान सरकार महाराष्ट्राच्या हितासाठी काम करत आहे, की गुजरातच्या हितासाठी काम करत आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. सुषमा अंधारे म्हणतात, ‘जमीन, वाहतूक, इलेक्ट्रिसिटी, कच्चा माल सगळं काही मुंबई महाराष्ट्रातले चालेल. चालणार नाही तो फक्त महाराष्ट्रातला मराठी माणूस! आर्या गोल्ड कंपनीच्या जाहिरातीत ‘अमराठी’ ही प्रमुख अट घातली आहे. महाराष्ट्राचे सरकार महाराष्ट्रासाठी आहे की गुजरातची मुनिमगीरी करण्यासाठी आहे?’ (हेही वाचा; IAS Puja Khedkar Missing? आयएएस पूजा खेडकर FIR नंतर गेल्या 5 दिवसांपासून बेपत्ता; मसुरीतील UPSC प्रशिक्षण केंद्रातही पोहोचली नाही)

या टीकेनंतर आर्य गोल्डने नोकरीच्या जाहिरातीमधून ‘अमराठी’ ही अट काढून टाकली आहे. दरम्यान, आर्या गोल्ड हे मुंबईमधील सोन्याच्या बांगड्यांचे उत्पादक आणि पुरवठादार आहे. 1965 साली श्यामसुंदर आर. ज्वेलर्स या नावाने श्यामलाल मोतनदास रुपरेजा यांनी त्याची स्थापना केली. आर्य गोल्ड ब्रँडची स्थापना बंटी श्यामलाल रुपरेजा आणि लालचंद श्यामलाल रुपरेजा यांनी केली आहे.