Online Fraud in Pune: इंदूर येथील ऑनलाईन स्टॉक ट्रेडिंग फर्मकडून एका तरूणाची 95 हजार 500 रुपयांची फसवणूक

सायबर गुन्हेगारीबाबत (Cyber Crime) सरकारकडून नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले जात असताना पुण्यातील (Pune) एका तरूणाला 95 हजारांचा ऑनलाईन गंडा घातल्याची माहिती समोर आली आहे.

Image For Representation (Photo Credit: Pixabay)

सायबर गुन्हेगारीबाबत (Cyber Crime) सरकारकडून नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले जात असताना पुण्यातील (Pune) एका तरूणाला 95 हजारांचा ऑनलाईन गंडा घातल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी तरूणाने इंदूर येथील एका स्टॉक ट्रेडिंग फर्मकडून (Online Stock Trading Firm) फसवणूक करण्यात आल्याची चंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्तीने डीमॅट खाते सुरु करण्यासाठी या कंपनीत 50 हजारांची गुंतवणूक केली होती. महत्वाचे म्हणजे, या व्यक्तीला दरमहा 5 हजार 500 रुपये मिळतील, असे कंपनीकडून सांगण्यात आले होते. त्यानुसार, सुरुवातीला त्याला ऑनलाईन ट्रान्सफरमार्फत पैसे मिळाले. मात्र, त्यानंतर एकदाही त्याला रक्कम मिळाली नसल्याने त्याने चंदननगर पोलिसांकडे धाव घेतली आहे.

मुकेश असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मुकेश हा खासगी कंपनीतील ग्राहक सेवा कार्यकारी म्हणून कार्यरत आहे. याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुनील गजानन थोपटे करत आहेत. थोपटे यांनी हिदुस्थान टाईम्सच्या अहवालात म्हटले आहे की, पोलिसांना ही तक्रार मिळताच त्यांनी व्यापारी कंपनीला हजर राहायला सांगितले होते. त्यांनी आदेशाचे पालन न केल्याने पोलिसांनी कंपनीविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. हे देखील वाचा- Cyber Alert: सावधान! नागरिकांची फसवणूक करण्यासाठी सायबर गुन्हेगारांनी शोधला आता 'हा' नवा पर्याय

पुण्यात दोन दिवसांपूर्वी सायबर गुन्हेगारांनी एका जेष्ठ नागरिकांची 10 हजारांची फसवणूक केली होती. सायबर चोरट्यांनी त्या जेष्ठ नागरिकाच्या बँक खात्याची ऑनलाइन माहिती मिळवून फसवणूक केली आहे. या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाराष्ट्रात ऑनलाइन शॉपिंगच्या घोटाळ्यात मोठी वाढ होताना दिसत आहे. महाराष्ट्रातील पोलिसांकडे गेल्या वर्षात ऑनलाइन शॉपिंगच्या घोटाळ्याची तब्बल 2 हजार 276 प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत. अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बुधवारी राज्य विधानसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिली होती. यातील 1 हजार 370 प्रकरणे पुण्यातील आहेत.