सर्वांना एकच कायदा; लॉक डाऊनचा नियम मोडून मुंबईहून सांगलीकडे येत असलेल्या पोलिसांवर गुन्हा दाखल

राज्यभरात सर्वत्र पोलीस, लॉक डाऊन पालन व्यवस्थित होत आहे का नाही याकडे लक्ष देत आहेत.

पोलीस-प्रातिनिधिक प्रतिमा | (Photo Credits: PTI)

सध्या कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) राज्यात लॉक डाऊन (Lockdown) चालू आहे. राज्यभरात सर्वत्र पोलीस, लॉक डाऊन पालन व्यवस्थित होत आहे का नाही याकडे लक्ष देत आहेत. लॉक डाऊनच्या नियमांचे पालन करणाऱ्या लोकांवर रोज गुन्हे दाखल होत आहेत. अशात सर्वांना समान कायदा या न्यायाने लॉक डाऊन मोडल्याने आता पोलिसांवरही  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक विजय गावडे, पोलीस नाईक संतोष किसन जाधव, हर्षदा संतोष जाधव व मोहिनी रवी जाधव अशी गुन्हा दाखल झालेल्या लोकांची नावे आहेत. हे लोक विना परवाना मुंबई वरून सांगलीकडे जात होते.

मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे कराड जवळील कासेगाव चेक पोस्ट येथे पोलिसांचे पथक कार्यरत होते. यावेळी मुंबईहून एक मोटार सांगलीच्या दिशेने जाण्यासाठी आली. पोलिसांनी चौकशीसाठी ही गाडी अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणालाही न जुमानता ही गाडी तशीच भरधाव धावू लागली. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी या गाडीचा पाठलाग सुरु केला. अखेर वाळवा तालुक्यातील नेर्ले येथे या गाडीला थांबवण्यात यश आले.

तपासणी केली असता या गाडीमध्ये मुंबईतील डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक विजय गावडे, वरळी वाहतूक विभागाकडील पोलीस नाईक संतोष जाधव व त्यांच्या कुटुंबातील हर्षदा जाधव व मोहिनी जाधव असल्याचे आढळले. त्यानंतर लॉक डाऊनचा नियम मोडल्याने या सर्वांच्यावर कासेगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. या दरम्यान थोडी शाब्दिक बाचाबाचीदेखील झाली मात्र कासेगाव पोलिसांनी या गाडीला पुढे जाऊ न देता त्यांना मुंबईकडे रवाना केले. (हेही वाचा: Lockdown: कोरोनाचा अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम, 3 मे नंतर लॉकडाऊन शिथिल होण्याची शक्यता- शरद पवार)

अशा प्रकारे नियमांच्या बाबतीत सामान्य जनता व पोलीस यांच्यामध्ये कोणताही भेदभाव न करता, पोलिसांवरही गुन्हा दाखल होऊ शकतो हे पोलिसांनीच दाखवून दिले.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif