MNS Leader Raj Thackeray (Photo Credits-Twitter)

समाजातील महिलांना समान अधिकार देणे आणि सन्मान करणे, या उद्देशाने संपूर्ण जगात दरवर्षी आजच्या दिवशी (8 मार्च) जागतिक महिला दिन (International Women's Day) साजरा केला जातो. महिला दिनाच्या निमित्ताने महिला शक्तीचा जागर केला जात आहे. दरम्यान, राजकीय नेते, कलाकार, खेळाडूसह अनेक क्षेत्रातून महिलांवर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष (MNS) राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून महिलांसाठी केलेली एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

राज ठाकरे यांनी महिला दिनाच्या निमित्ताने एक पोस्ट शेअर करत आपले रोखठोक मत मांडले आहे. दरम्यान, राज ठाकरे म्हणाले की, “8 मार्च, आज जागतिक महिला दिन. मूळात महिला दिन हा वर्षातून एकदाच का साजरा करायचा हे मला समजत नाही. आमचे आजोबा, प्रबोधनकार ठाकरे म्हणायचे, ‘बांधवांनो, महिलांबद्दल जितका-जितका आदर तुम्ही आपल्या अंतःकरणात साठवत जाल, वाढवत जाल, तितके शिवराय तुमच्यावर फार प्रसन्न होतील.’ त्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जशी 365 दिवस साजरी व्हायला हवी तसंच महिलांचा म्हणजे खऱ्या अर्थाने या जगतनियंत्याचा सन्मान 365 दिवस साजरा झाला पाहिजे. असो.

“मी मागे एकदा एका भाषणात माता-भगिनींना उद्देशून जे बोललो होतो ते आज पुन्हा सांगतो; तुम्हाला कोणी सक्षम करण्याची गरज नाही तुम्ही स्वतः सक्षमच आहात. तुम्ही तुमच्या सद्सद्विवेक बुद्धीला स्मरून आणि दुसऱ्या स्त्रीचे दुःख आपले मानून कृती करू लागलात तर जगात कुठल्याच स्त्रीवर अन्याय होऊ शकणार नाही. राजकारणात किंवा समाजकारणात कार्यरत असणाऱ्या महिलांनाही माझे आवर्जून सांगणे आहे तुम्ही कोणाचेही प्यादे बनून रहायची गरज नाही. तुम्ही थेट निर्णय प्रक्रियेत सहभागी व्हा. तुम्हाला अपेक्षित बदल तुम्हीच घडवू शकता आणि जग बदलवू शकता. बाकी पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा,” अशी पोस्ट राज ठाकरे यांनी केली आहे. हे देखील वाचा- Happy Women's Day 2021: पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज ठाकरे ते सॅन्ड आर्टिस्ट Sudarsan Pattnaik यांनी महिला दिनी नारी शक्तीला सलाम करत दिल्या महिला दिनाच्या शुभेच्छा

राज ठाकरे यांचे ट्विट-

 

महिला दिन साजरा करण्याची सुरुवात 28 फेब्रुवारी 1909 साली झाली होती. मात्र, 8 मार्च, 1917 रोजी रशियातील महिलांना मताधिकार प्राप्त झाला होता. संयुक्त राष्ट्रसंघाने 1975 साली या दिवसाला अधिकृत मान्यता दिली. त्यानंतर 8 मार्च हा दिवस नियमितपणे जागतिक पातळीवर ‘जागतिक महिला दिवस’ साजरा करण्यास सुरुवात झाली.