Omicron Subvariants in India: कोविड रुग्णवाढीमागे ओमिक्रॉनचे चार नवीन सब-वेरिएंट, NIV कडून तपास सुरू

कोविड रुग्णवाढीमागे ओमिक्रॉनचे चार नवीन सब-वेरिएंट कारणीभूत असल्याची शक्यता असून पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (NIV) कडून त्यांचे जिनोम सिक्वेन्सिंग (अनुक्रमण) सुरू आहे. ही प्रक्रिया लसीच्या प्रभावीतेचे मूल्यांकन करण्यास मदत करणार आहे.

Omicron Subvariants in India: कोविड रुग्णवाढीमागे ओमिक्रॉनचे चार नवीन सब-वेरिएंट, NIV कडून तपास सुरू
COVID-19 | (Representative Image)

Covid Surge India: देशात पुन्हा वाढत असलेल्या कोविड-19 रुग्णसंख्येमागे ओमिक्रॉन व्हेरिएंटचे (Omicron Subvariants India) चार नवीन सब-वेरिएंट कारणीभूत असल्याचे पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (NIV Pune) ने स्पष्ट केले आहे. संस्थेचे संचालक डॉ. नवीन कुमार यांनी बुधवारी (18 जून) सांगितले की, हे व्हेरिएंट्स सध्या जिनोम सिक्वेन्सिंग व आयसोलेशन प्रक्रियेत आहेत आणि त्यामुळे लसींच्या प्रभावीतेचे मूल्यांकन करता येईल. LF.7, XFG, JN.1.16 आणि NB.1.8.1 हे चार नवीन सब-वेरिएंट देशभरातील नमुन्यांच्या जिनोम सिक्वेन्सिंगनंतर आढळून आले आहेत.

एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोविड रुग्णांमध्ये वाढ

डॉ. कुमार यांनी सांगितले की, एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोविड रुग्णवाढीमध्ये वाढ दिसून आली. सुरुवातीला ही वाढ JN.1.16 मुळे झाली होती, तर मे महिन्यापासून XFG (LF.7 आणि LP.81.2) या रीकॉम्बिनंट व्हेरिएंटने त्याची जागा घेतली आहे. या व्हेरिएंट्सचे संपूर्ण जिनोम डेटा इंडियन बायोलॉजिकल डेटा सेंटर आणि GISAID या जागतिक डेटाबेसला सादर करण्यात आला आहे.

वैज्ञानिक नवीन व्हेरिएंट्सवर लक्ष ठेवून

"NIV पुणे मधील वैज्ञानिक सतत नवीन व्हेरिएंट्सवर लक्ष ठेवून आहेत, त्यांचे जिनोम सिक्वेन्सिंग व आयसोलेशनही करत आहेत. सिंगापूरमध्ये सध्या फिरणारा स्ट्रेन भारतात पाच ते सहा आठवड्यांपूर्वी सापडला होता," असे डॉ. कुमार यांनी सांगितले. त्यांनी असेही नमूद केले की, आयसोलेशनची प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असून लस बदलण्याची आवश्यकता असल्यास त्यासाठी उपयोगी ठरते. सध्या तरी हे व्हेरिएंट गंभीर स्वरूपाचे वाटत नाहीत, मात्र याबाबत अंतिम निर्णय धोरणकर्ते घेतात आणि तोही व्यापक विश्लेषणानंतरच घेतला जातो, असे त्यांनी स्पष्ट केले. (हेही वाचा, New COVID Variant: कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने वाढवला पुन्हा तणाव; किती घातक आहे ओमिक्रॉनचा Eris स्ट्रेन? जाणून घ्या)

भारतामध्ये सध्या दोन ओमिक्रॉनवर आधारित मोनोव्हॅलेंट लसी उपलब्ध आहेत – बायोलॉजिकल ई लिमिटेडची कोर्बिवॅक्स आणि सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कोवोव्हॅक्स. आरोग्य मंत्रालय परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे. 18 जून रोजी देशातील सक्रिय कोविड रुग्णसंख्या 6,483 होती, जी मंगळवारी 6,837 होती. रुग्णसंख्येमध्ये किंचित घट झाली आहे.

अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, बहुतांश रुग्ण सौम्य लक्षणांसह घरीच उपचार घेत आहेत. 1 जानेवारीपासून आतापर्यंत एकूण 113 मृत्यू नोंदवले गेले असून त्यापैकी बहुतांश जण आधीपासूनच गंभीर आजारांनी ग्रस्त होते.

दरम्यान, केरळमध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या असून त्यानंतर गुजरात, कर्नाटक आणि दिल्लीचा क्रम लागतो, असे आरोग्य मंत्रालयाने रविवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीत म्हटले आहे. दरम्यान, सर्व राज्यांना ऑक्सिजन, आयसोलेशन बेड्स, व्हेंटिलेटर्स आणि आवश्यक औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले.

(The above story first appeared on LatestLY on Jun 18, 2025 08:25 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).