Omicron Scare: शिर्डीच्या साईबाबा मंदिरामध्ये रात्री 9 नंतर भाविकांना प्रवेश नाही

काही पुजार्‍यांच्या उपस्थितीमध्ये काकड आरती होणार आहे.

शिर्डी साईबाबा मंदिर ( Photo Credit: Wikimedia Commons )

भारतामध्ये ओमिक्रॉन या कोविड 19 व्हेरिएंटचा (Omicron Variant)  वाढता धोका पाहता आता निर्बंध कडक करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातही रात्री 9 नंतर जमावबंदी लागू करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर शिर्डीच्या साईबाबा मंदिरामध्ये (Shirdi Sai Baba Temple) भाविकांच्या प्रवेशावर निर्बंध आले आहेत. आता मंदिरात गर्दी टाळण्यासाठी ऑनलाईन बुकिंग (Online  Booking) करण्याचं आवाहन करण्यात आले आहे यामुळे दर्शनाची गैरसोय टाळण्यास मदत होणार आहे. तर रात्री 9 नंतर मंदिरात भाविकांना प्रवेश बंद ठेवण्यात आला आहे. हे देखील वाचा: Night Curfew In Maharashtra: कोरोना वाढू द्यायचा नसेल तर सर्वांनी आरोग्याचे नियम पाळावेत; मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांचे अवाहन .

नव्या नियमांनुसार, साई मंदिरामध्ये बदल करण्यात आला आहे. आता भाविकांना केवळ सकाळी सहा ते रात्री 9 ही दर्शनाची वेळ असणार आहे. भाविकांना पहाटे होणारी बाबांची काकड आरती आणि रात्रीची शेजारती यावेळी प्रवेश नसेल. काही पुजार्‍यांच्या उपस्थितीमध्ये काकड आरती होणार आहे. मंदिर परिसरामध्ये करोना नियमांचं भाविकांनी पालन करावं असे आवाहन देखील जिल्हा प्रशासन आणि मंदिर व्यवस्थापनाकडून करण्यात आले आहे.

भारतामध्ये ताज्या आकडेवारीनुसार, ओमिक्रॉनची लागण झालेल्यांचा आकडा 422 आहे. यात महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक रूग्ण असल्याने नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी जारी नियमावली प्रमाणे आता अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी नागरिकांना लग्नसमारंभ, बंदिस्त खोलीतील कार्यक्रम मर्यादित लोकांच्या उपस्थितीमध्येच पार पाडण्याचे आवाहन आहे.