IPL Auction 2025 Live

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध लिहिली आक्षेपार्ह पोस्ट; शिवसैनिकांनी घरात घुसून केली मारहाण व मुंडण

या वक्त्यव्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट लिहिणाऱ्या एका व्यक्तीला शिवसैनिकांनी मारहाण करत सर्वांसमक्ष त्याचं मुंडण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

राहुल उर्फ हिरामणी तिवारी (संग्रहित संपादित प्रतिमा)

सध्या देशात नागरिकत्व कायद्याविरोधात (Citizenship Amendment Act) मोठे आंदोलन पेटले आहे. याचबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आपले मत व्यक्त केले होते. या वक्त्यव्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट लिहिणाऱ्या एका व्यक्तीला शिवसैनिकांनी मारहाण करत सर्वांसमक्ष त्याचं मुंडण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राहुल उर्फ हिरामणी तिवारी असे या व्यक्तीचे नाव असून तो वडाळा येथील रहिवासी आहे. 19 डिसेंबर रोजी राहुलने मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह पोस्ट लिहिली होती. त्यानंतर काल दुपारी शिवसैनिकांनी या व्यक्तीचे मुंडण केले.

देशातील अनेक शहरांत लोक रस्त्यावर उतरून सरकारच्या नव्या नागरिकत्व कायद्याविरोधात संताप व्यक्त करत आहेत. असेच आंदोलन जामिया मिलियाच्या विद्यार्थ्यांनीही केले होते. मात्र पोलिसांनी त्यांच्यावर लाठीहल्ला केला. या घटनेबाबत उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत या हल्ल्याची तुलना जालियनवाला बाग हत्याकांडाशी केली होती. त्यानंतर राहुलने याबाबत टीका करत आक्षेपार्ह पोस्ट लिहिली. यामुळे भडकलेले स्थानिक शिवसेना शाखाप्रमुख समाधान जुगदर व अन्य 20-25 शिवसैनिकांनी राहुलचे घर गाठले व त्याला मारहाण केली.

(हेही वाचा: धक्कादायक! प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या वृद्धास जबर मारहाण; पहा व्हिडीओ)

इतकेच नाही तर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी राहुलचे केस कापून मुंडणही केले. याबाबत राहुलने पोलिसांकडे तक्रार केल्यावर, पोलिसांनी दोन्ही पक्षांना 149 ची नोटीस पाठवली आहे. दरम्यान राहुल या नव्या कायद्याचे समर्थन करतो तसेच नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ आयोजित कार्यक्रमालाहे त्याने हजेरी लावली होती. हिरामणी तिवारी हा बजरंग दल, विश्वहिंदू परिषद यांचाही कार्यकर्ता असल्याचे बोलले जात आहे.