कोरोना व्हायरसमुळे वुहान येथे असंख्य नागरिकांचे रस्त्यावरच मृत्यू? सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारा व्हिडिओ खोटा असल्याची माहिती समोर

कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत 3 हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमावला आहे. तर, 80 हजार लोकांना यांची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. यातच चीन मधील वुहान (Wuhan) शहरात कोरोना व्हायरसने संक्रमित असलेल्या असंख्य रुग्णांचा रस्त्यावरच मृत्यू झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) धुमाकूळ घालत आहे.

कोरोना व्हायरस संबंधी खोटा व्हिडीओ (Photo Credits: Video Grab)

कोरोना व्हायरसने (Coronavirus) चीनसह जगभरात थैमान घातले आहे. कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत 3 हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमावला आहे. तर, 80 हजार लोकांना यांची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. यातच चीन मधील वुहान (Wuhan) शहरात कोरोना व्हायरसने संक्रमित असलेल्या असंख्य रुग्णांचा रस्त्यावरच मृत्यू झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) धुमाकूळ घालत आहे. यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. मात्र, नुकताच वुहानमधून परतलेल्या एका लातूरच्या विद्यार्थ्याने या व्हिडिओ संदर्भात महत्वाची माहिती दिली आहे. तसेच सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ खोटा असल्याचा त्याने दावा केला आहे. कोरोना व्हायरसचा अधिक प्रदुर्भाव वाढल्याने नागरिकांना घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला होता. महत्वाचे म्हणजे, कोरोना व्हायरसची लागण होऊ नये म्हणून स्वता नागरिक घराबाहेर टाळत आहेत, अशी माहिती मिळाली आहे.

आशिष कुर्मे असे माहिती देणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव असून तो वुहान शहरातील एका विद्यापीठात एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे. मात्र, चीनमध्ये कोरोनाने थैमान घातल्यामुळे त्याने भारतात परतण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, त्याने सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ खोटा असल्याचे दावा त्याने केला आहे. मी हा व्हिडीओ भारतात आल्यानंतर पाहिला. मात्र, इतकीही भीषण परिस्थिती वुहानमध्ये नाही, असे आशिषने सांगितले. सुरुवातीला शहरात कुठेही जाण्या-येण्याला बंदी नव्हती. मात्र, कोरोना व्हायरस वाढल्यानंतर शहरात बंदी घालण्यात आली. नागरिकांना घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आले. तसेच आम्हाला मास देण्यात आले. भितीमुळे लोकांनी घराबाहेर पडणे टाळले होते. सध्या सर्वच रस्ते सामसूम आहेत, कोणीही रस्त्यावर फिरत नाहीत, असेही आशिषने सांगितले आहे. हे देखील वाचा- कोरोना व्हायरसमुळे जागतिक मृत्युदर 3.4 टक्क्यांवर पोहचला, 'फ्लू'पेक्षाही जास्त; लस उपलब्ध नसली तरी आजार बरा होऊ शकतो- WHO

कोरोना व्हायरसच्या संदर्भात चुकीची माहिती लोकांसमोर मांडली जात होत्या. तसेच सोशल मीडियावर खोटे व्हिडिओ व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे लोकांच्या मनात अधिक भिती निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमिवर कोरोना व्हायरस संदर्भात सोशल मीडियावर अफवा पसरवल्यास संबंधित व्यक्तीच्या विरोधात कारवाई केली जाणार आहे, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला होता. कोरोना व्हायरस प्रचंड वेगाने पसरत आहे. कोरोनाचा पहिला रोगी हा चीनमध्ये आढळला. कोरोनामुळे चीनमध्ये 3 हजार पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला. भारतात कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता 31 वर पोहोचल्याचे समजत आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने 31 मार्चपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांना बायोमॅट्रिक अटेंडंस न करण्याचे आदेश दिले आहेत.