आता ड्रायव्हिंग लायसन्सशी संबंधित अनेक सेवा मिळणार ऑनलाइन, RTO मध्ये जाण्याची गरज नाही, जाणून घ्या सविस्तर

विभागामार्फत 115 परवाना, नोंदणी प्रमाणपत्र, परवाना संबंधित सेवा देण्यात येत असून, केंद्र शासनाच्या सूचनांनुसार 80 सेवा ऑनलाईन असून, आज सहा सेवा ऑनलाईन पद्धतीने सुरू केल्या आहेत. याचा तब्बल 20 लाख लोकांना लाभ मिळेल

आता ड्रायव्हिंग लायसन्सशी संबंधित अनेक सेवा मिळणार ऑनलाइन, RTO मध्ये जाण्याची गरज नाही, जाणून घ्या सविस्तर
Representational Image | Driving (Photo Credits: Unsplash)

परिवहन विभागामार्फत देण्यात येणाऱ्या 115 सेवांपैकी 80 सेवा ऑनलाईन पद्धतीने देण्यात येत आहेत. आता परिवहन प्राधिकरण (RTO) कार्यालयात वाहन चालक परवानाचे नूतनीकरण, दुय्यम वाहन चालक परवाना, वाहन-चालक परवानामधील पत्ता बदल, दुय्यम वाहन नोंदणी प्रमाणपत्र, वाहन नोंदणी प्रमाणपत्राचा पत्ता बदल तसेच बाहेरील राज्यात जाण्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र अशा गोष्टींसाठी जावे लागणार नाही. आता या सहा सेवा ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात आल्या असल्याची माहिती परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांनी दिली. परिवहन आयुक्त कार्यालयात आज या सहा सेवांचे लोकार्पण मंत्री परब यांच्या हस्ते करण्यात आले.

मंत्री परब म्हणाले, विभागामार्फत 115 परवाना, नोंदणी प्रमाणपत्र, परवाना संबंधित सेवा देण्यात येत असून, केंद्र शासनाच्या सूचनांनुसार 80 सेवा ऑनलाईन असून, आज सहा सेवा ऑनलाईन पद्धतीने सुरू केल्या आहेत. याचा तब्बल 20 लाख लोकांना लाभ मिळेल. पारदर्शक सेवा नागरिकांना मिळावी यासाठी या सेवा आधारकार्डसोबत जोडण्यात आल्या असल्याचेही त्यांनी सांगितले.

अर्जदार अर्ज, पेमेंट व कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करु शकतो. या सेवांचा लाभ घेण्याकरिता  आधार क्रमांकचा वापर करण्यात येणार असून, आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईलवर OTP पाठविण्यात येणार, त्यानंतर  त्याची नोंदणी परिवहन या संकेतस्थळामध्ये केल्यास परवाना/नोंदणी प्रमाणपत्रामधील अर्जदाराची माहिती व आधार अभिलेखातील अर्जदाराची माहिती याची खातरजमा झाल्यानंतरच पुढे अर्ज करणे शक्य होणार आहे. अर्जदाराचे नाव, पत्ता, जन्म तारीख व मोबाईल क्रमांक याची खातरजमा झाल्यामुळे आता पुढील नमुद 6 अर्जाकरिता कार्यालयामध्ये येण्याची आवश्यकता नाही. तसेच नवीन परवाना/नोंदणी प्रमाणपत्र अर्जदारास पोस्टाने पाठविण्यात येणार आहे. (हेही वाचा: लवकरच मुंबईच्या CSMT येथे सुरु होणार पॉड हॉटेल; जाणून घ्या काय असतील सुविधा)

राज्यामध्ये दुय्यम नोंदणी प्रमाणपत्राकरिता वर्षभरात एक लाख अर्ज प्राप्त होतात. ना-हरकत प्रमाणपत्राकरिता वर्षभरात 30,000 तर, नोंदणी प्रमाणपत्रावरील पत्ता बदलाकरिता 20,000 अर्ज, परवानाचे दुय्यमीकरण प्रमाणपत्राकरिता दोन लाख अर्ज, परवानावरील पत्ता बदलकरिता दोन लाखाहून अधिक अर्ज प्राप्त होतात. परवानाच्या नूतनीकरणाकरिता 14 लाख अर्ज प्राप्त होतात. आता ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पूर्ण होणार आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jun 02, 2022 10:18 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).