वणीच्या सप्तशृंगी देवीचे गाभाऱ्यातून दर्शन घेण्यासाठी पाळावा लागेल महत्वाचा नियम; 1 जानेवारीपासून अंमलबजावणी
नवरात्रासह वर्षभर या चारही देवींच्या मंदिरात दर्शनासाठी भाविकांची रांग लागलेली असते. यातील वणीची सप्तशृंगी (vani Saptshrungi)हे पीठ नाशिक जिल्ह्यात आहे.
महाराष्ट्रात साडेतीन शक्तिपीठे (Sade Teen Shakti Peeth) लोकप्रिय आहेत. नवरात्रासह वर्षभर या चारही देवींच्या मंदिरात दर्शनासाठी भाविकांची रांग लागलेली असते. यातील वणीची सप्तशृंगी (vani Saptshrungi)हे पीठ नाशिक जिल्ह्यात आहे. आता लाखोंची कुलदैवत आणि श्रद्धास्थान असलेल्या वणी गडावरच्या सप्तश्रृंगी देवीचे दर्शन घेण्यासाठी तुम्हाला काही नियम पाळावे लागणार आहेत. देवस्थान ट्रस्टकडून हे नवीन नियम नव्या वर्षापासून लागू करण्यात येतील. यातील एक महत्वाचा नियम म्हणजे आता तुम्हाला देवीच्या गाभाऱ्यात जाऊन देवीचे दर्शन घेता येणार नाही. मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी सप्तश्रृंगी देवस्थानने हा निर्णय घेतल्याचे समजत आहे.
यासोबतच नवीन वर्षापासून देवीचे गाभाऱ्यातून दर्शन घेण्यासाठी ठराविक कपडे परिधान करणे गरजेचे असणार आहे. पुरुषांनी सोवळे आणि महिलांनी साडी परिधान करणे अनिवार्य असणार आहे. आतापर्यंत भक्त अगदी गाभाऱ्यात प्रवेश करून देवीच्या पायावर डोके ठेऊन दर्शन घेऊ शकत असत. मात्र आता नोंदणी केलेल्या भाविकांनाच केवळ गाभाऱ्यात दर्शन घेता येणार आहे. देवस्थानचा हा नियम 1 जानेवारीपासून लागू होईल. देवस्थान अध्यक्ष आणि अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश गणेश देशमुख यांनी ही माहिती दिली. (हेही वाचा: नाशिक: सप्तशृंगी गडाजवळच्या शिखरावर देवदर्शनावेळी भांडण झाल्याने संतप्त झालेल्या नवऱ्याने बायकोला 800 फूट दरीत ढकलले)
या निर्णय घेण्याआधी देवस्थानने पुरातत्व विभागाशी संपर्क साधला होता. त्यातून देवीची मूर्ती जतन करण्यासाठी मूर्तीजवळ जाणाऱ्या भक्तांची संख्या कमी करावी असे ठरले. त्यानंतर देवस्थानने हा निर्णय घेतला. दक्षिणेकडील अनेक मंदिरांत ठराविक कपडे घालूनच आत जाण्याचा नियम आहे. आता याच धर्तीवर सप्तशृंगी गडावरही हा नियम केला गेला आहे. दरम्यान, वणीची सप्तशृंगीही साडे तीन शक्तिपीठांपैकी अर्ध शक्तीपीठ आहे. महाकाली, महालक्ष्मी आणि सरस्वतीचं एक रूप म्हणजे सप्तशृंगी असं मानलं जातं. महिषासुर राक्षसाबरोबर युद्ध करण्यासाठी देवीने अष्टभुजा रूप घेतलं आणि सर्व देवांनी तिला अस्त्रे दिली अशी आख्यायिका आहे.