सत्तास्थापनेचा मुहूर्त हुकला, आता 'या' दिवशी असेल अमित शाह यांचा मुंबई दौरा?
याबाबतची आज, मंगळवारी होणारी पहिली बैठक रद्द झाली आहे. या बैठकीमध्ये उभय पक्षाचे प्रत्येकी दोन नेते सहभागी होणार होते.
महाराष्ट्रामध्ये यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला सर्वात जास्त जागा मिळाल्या. आता चर्चा सुरु आहे ती सत्तावाटपाची, मात्र यातही भाजप (BJP) आणि शिवसेना (Shiv Sena) यांमध्ये संघर्ष दिसून येत आहे. याबाबतची आज, मंगळवारी होणारी पहिली बैठक रद्द झाली आहे. या बैठकीमध्ये उभय पक्षाचे प्रत्येकी दोन नेते सहभागी होणार होते. आता या आठवड्याच्या शेवटी ही बैठ होण्याची शक्यता आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा (Amit Shah) येत्या 1 किंवा 2 नोव्हेंबर रोजी मुंबई दौऱ्यावर असणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे 31 तारखेला नवीन सरकारचा शपथविधी होण्याची शक्यता मावळली आहे.
30 नोव्हेंबर रोजी अमित शाह यांचा मुंबई दौरा होता. मात्र शिवेसेनेने आपले मुखपत्र 'सामना'मधून भाजपवर टीका केल्यानंतर अमित शाह यांनी हा दौरा रद्द केला. आता आजच्या सत्तास्थापनेच्या पहिल्या बैठकीपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया देत, 50-50 चा फॉर्म्युला ठरलाच नसल्याचे सांगितले. या वक्तव्यामुळे शिवसेना चांगलीच आक्रमक झाली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी ही बैठक रद्द केल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली. आता 1 नोव्हेंबर रोजी अमित शाह मुंबईमध्ये येतील त्यानंतर उद्धव ठाकरेंशी चर्चा करून सत्तास्थापनेचा फॉर्म्युला ठरवला जाईल. 3 तारखेच्या दरम्यान सत्ता स्थापनेसंदर्भात राज्यपालांकडे दावा दाखल करण्यात येईल अशी चर्चा सध्या सुरू आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी अनौपचारिकरित्या बोलताना आपणच पुढील 5 वर्षांसाठी मुख्यमंत्री होऊ असे सांगितले होते. आपण 50-50 चे आश्वासन दिले नसल्याचेही त्यांनी म्हटले. मात्र मुख्यमंत्री फडणवीस आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याशी झालेल्या चर्चेत अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याचे ठरले असल्याची माहिते उद्धव ठाकरे यांनी दिली. अशा प्रकारे युतीमध्ये सुरु झालेला ताणतणाव अमित शाह यांच्या भेटीमुळे कमी होतो का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.