कोल्हापूर, पुणे नाही तर नाशिकची मिसळ ठरली राज्यात भारी; महाराष्ट्र पर्यटन विभागाने केले शिक्कामोर्तब

कोल्हापूरचे खास मसाले या मिसळसाठी वापरले जातात. आता नाशिकने या शर्यतीत बाजी मारली आहे. मुंबईमध्येही मिसळपाव एक खास डिश मानली जाते.

मिसळपाव (Photo Credit : Youtube)

पर्यटन, साहित्य, चित्रपट, संस्कृती अशा अनेक गोष्टींसह महाराष्ट्र प्रसिद्ध आहे, इथल्या खवैयांसाठी. वडापाव, पुरणपोळी असे अनेक पदार्थ आता जागतिक पातळीवर महाराष्ट्राची ओळख बनले आहेत. आता त्यात भर पडली आहे ती मिसळपावची (Misal pav). महाराष्ट्राला मिसळपाव ची परंपरा फार वर्षांपासून आहे. त्यात कोल्हापूर आणि पुण्याची मिसळ तर जीव की प्राण. मात्र आता कोल्हापूर नाही, पुणे नाही तर नाशिकची (Nashik) मिसळ ठरली आहे राज्यात भारी. महाराष्ट्र पर्यटन विभागाने यावर शिक्कामोर्तब केले आहे. नुकतेच विभागाने ट्वीट करत ही माहिती दिली.

सांस्कृतिक आणि धार्मिक क्षेत्र म्हणून नाशिक प्रसिद्ध आहे. आता मिसळीसाठीही हे शहर ओळखले जाणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने ही माहिती दिली आहे. विभागाने ट्वीटमध्ये म्हटले आहे, ‘नाशिकची मिसळ पाव ही अशी काही डिश नाही जी तुम्ही कोणत्याही जवळच्या रेस्टॉरंटमध्ये खाऊ शकत नाही. मिसाळपाव ही महाराष्ट्राची एक खास पाककृती मानले जाते आणि या पदार्थासाठी नाशिकने उत्कृष्ट कामगिरी केली आहे.’ अशाप्रकारे झणझणीत मिसळमुळे नाशिकच्या ओळखीत आणखी भर पडणार आहे. (हेही वाचा: मुंबईत या '6' ठिकाणी मिळणारी चविष्ट मिसळ, चाखायलाच हवी !)

याआधी कोल्हापूर आणि पुणे मिसळपाव साठी प्रसिद्ध होते. कोल्हापूरचे खास मसाले या मिसळसाठी वापरले जातात. आता नाशिकने या शर्यतीत बाजी मारली आहे. मुंबईमध्येही मिसळपाव एक खास डिश मानली जाते. याआधी दादर येथील मिसळपावला जगातील पारितोषिक मिळाले होते त्यामुळे जगातील पातळीवरही मिसळीलाएक खास स्थान प्राप्त झाले होते.