मुंबई: गोरेगाव, मालाड, कांदिवली आणि बोरिवली भागात 25-26 जुलै रोजी पाणी पुरवठा बंद; सहकार्य करण्याचे पालिकेचे आवाहन

जलवाहिनी जोडण्याचे काम करण्यात येणार असल्यामुळे मुंबईच्या काही भागात पाणीपुरवठा होणार नसल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली आहे.

No Water Supply in Mumbai | Representational Image | (Photo Credit: Facebooki)

ऐन पावसाळ्यात मुंबईकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. जलवाहिनी जोडण्याचे काम करण्यात येणार असल्यामुळे मुंबईच्या काही भागात पाणीपुरवठा होणार नसल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली आहे. यात गोरेगाव (पूर्व-पश्चिम), मालाड (पूर्व-पश्चिम), कांदिवली (पूर्व-पश्चिम) तसेच बोरिवली (पश्चिम) या भागांचा समावेश असून या विभागातील पाणीपुरवठा दोन दिवसांसाठी खंडित करण्यात येणार आहे. (सावधान! सुनिश्चित वेळेत पाऊस पडला नाही तर मुंबईकरांवर येऊ शकते पाणीकपातीचे भयाण संकट)

मालाड टेकडी जलाशय येथे 2400 मिमी व्यासाच्या जलवाहिनीवर 1500 मिमी व्यासाची जलवाहिनी जोडण्याचे काम तातडीन सुरु करण्यात येणार असल्याने याचा परिणाम पाणी पुरवठ्यावर होणार आहे. गुरुवार 25-07-2019 रोजी रात्री 12 पासून ते शुक्रवारी 26-07-2019 रोजी रात्री 12 पर्यंत हे काम चालणार असल्याने त्या दरम्यान पाणी पुरवठा होणार नाही, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे देण्यात आली आहे. (तलावसाठ्यात वाढ झाल्याने मुंबईसह उपनगरांमधील 10 टक्के पाणीकपात रद्द)

त्यामुळे नागरिकांनी खबरदारी म्हणून आदल्या दिवशी पुरेसे पाणी भरुन ठेवावे, पाण्याचा वापर जपून करावा आणि प्रशासनास योग्य ते सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे.

पावसाळा सुरु होण्यापूर्वी पाणीटंचाईचे भीषण संकट मुंबईकरांच्या डोक्यावर होते. मात्र पुरेशा पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणं आणि तलाव पूर्ण भरल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.