No Water Cut In Pune: पुण्यात यंदा उन्हाळ्यात पाणी कपातीचं संकट नाही

यंदा शहरासह ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण प्रकल्पात सध्या १६.१९ टीएमसी अर्थात ५५.५५ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

Water Supply | (Photo credit: archived, edited, representative image)

वातावरणीय बदलांचा परिणाम आता हळूहळू प्रत्येक ऋतूमध्ये तीव्रतेने जाणवायला लागला आहे. अजून उन्हाळ्याला सुरूवात झाली नसली तरीही राज्यात अनेक ठिकाणी पाणी संकट घोंघावायला सुरूवात झाली आहे. पुणेकरांना मात्र यंदा पाणी कपातीला सामोरं जावं लागणार नसल्याची माहिती समोर आली आहे. आज कालवा समितीच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रात यंदा 25 वर्षातील सर्वात कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे सहाजिकच काही भागात पाणी कपातीच्या संकटाची भीती होती मात्र अशा परिस्थितीतही यावेळी पुणेकरांना पाणी कपातील सामोरे जावे लागणार नाही.

पुणे जिल्ह्यामध्ये शेतीला पाणी पुरवठा केला जाणार आहे. शेतीला उन्हाळ्यात 2 आवर्तनं सोडली जाणार आहेत. पहिलं आवर्तन 3 मार्चपासून सुरू होत आहे तर शेतीसाठी 7 टीएमसी पाणी सोडले जाईल. यामुळे पुण्यातील नागरिक, शेतकरी सुखावले आहेत. Mumbai Water Cut: मुंबईला पाणीटंचाईची चिंता! तलावांनी गाठली 2 वर्षातील नीचांकी पातळी, पुढील काही महिन्यांत पाणीकपात होण्याची शक्यता .

या बैठकीला पुणे, नगर आणि सोलापुर जिल्ह्यातील लोकप्रतिनीधी उपस्थित होते. तसेच खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांनीही या बैठकीला हजेरी लावली होती त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. यंदा शहरासह ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण प्रकल्पात सध्या १६.१९ टीएमसी अर्थात ५५.५५ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.  त्यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.