नागपूर येथून सुटलेल्या 'श्रमिक स्पेशल ट्रेन' मधील प्रवाशांच्या तिकीटासाठी नितीन राऊत यांची 5 लाखाची मदत; कामगारांचे प्रवास भाडे केंद्र सरकारने देण्याचे आवाहन
यासाठी रेल्वे मंत्रालयाने 'श्रमिक स्पेशल ट्रेन' (Shramik Special Train) चालविण्याची घोषणा केली आहे
कोरोना व्हायरस लॉक डाऊन (Coronavirus Lockdown) मध्ये अडकलेल्या लोकांना त्यांच्या मूळ राज्यात पोहोचण्याची मोदी सरकारने परवानगी दिली आहे. यासाठी रेल्वे मंत्रालयाने 'श्रमिक स्पेशल ट्रेन' (Shramik Special Train) चालविण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार आज संध्याकाळी 7.30 वाजता नागपूरवरून (Nagpur) लखनऊ (Lucknow) साठी ट्रेन रवाना झाली. याच्या तिकिटांच्या बाबतीत रेल्वेने सांगितले होते की, स्थानिक राज्य सरकार प्रवाशांना तिकिटे देईल आणि त्यांच्याकडून जमा केलेली रक्कम रेल्वेला सोपवेल. त्यानुसार या नागपुरातून निघालेल्या प्रवासी कामगारांकडून प्रवासासाठी 505 रुपये आकारले गेले आहेत. मात्र ही अतिशय अन्यायकारक बाब असल्याचे मत ऊर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी व्यक्त केले आहे.
याबाबत बोलताना नितीन राऊत म्हणाले, ‘कामगारांकडून प्रवासाचे पैसे वसूल करणे ही गोष्ट योग्य नाही. केंद्र सरकारने या तिकिटांसाठी पीएम केअर फंडातून पैसे द्यावेत. या कामगारांच्या तिकिटांसाठी मी वैयक्तिकरित्या 5 लाख रुपये दिले आहेत.’ लॉकडाऊनमुळे 970 नागरिक नागपूरच्या वेगवेगळ्या आश्रयस्थानात थांबले होते, त्यांना घेऊन कामगारांची विशेष ट्रेन आज नागपूरहून लखनऊला सायंकाळी साडेसात वाजता सुटली.
मात्र लॉक डाऊनमुळे अनेक व्यवसाय बंद पडले आहेत, परिणामी या कामगारांकडे कामे नाहीत. या अवस्थेत लोकांकडून 505 रुपये आकारले गेल्याने नितीन राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयालाही पत्र लिहिले आहे. आपल्या पत्रात ते लिहितात, ‘केंद्र शासनाने लॉक डाऊनमुळे अडकुन पडलेल्या देशातील विविध राज्यातील नागरीकांना त्यांच्या स्वगृही परतण्यासाठी, श्रमीक एक्सप्रेस नावाने विशेष रेल्वे सेवा उपलब्ध करुन दिलेली आहे. परंतु सदर रेल्वे गाडीने प्रवास करणा-या नागरीकांकडून प्रवासभाडे आकारण्यात येत आहेत. अशा कठिण परिस्थितीत या आर्थिक भाराचे शासन स्तरावर नियोजन झाल्यास सदर नागरीकांना महाविकास आघाडी सरकार त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे असा सकारात्मक संदेश जाईल. तरी याबाबत आपले स्तरावर आवश्यक कार्यवाही करावी ही विनंती.’ (हेही वाचा: महाराष्ट्रातील नागरिकांच्या चिंतेत भर; राज्यात आज 678 नव्या रुग्णांची नोंद तर, एकूण 27 जणांचा मृत्यू)
यासोबतच आज नागपूर येथून सुटलेल्या गाडीमधील कामगारांसाठी नितीन राऊत यांनी स्वतः 5 लाख रुपये देऊन, या कामगारांना मदतीचा हात पुढे केला आहे.