Nirbhaya Case: निर्भयाच्या आरोपींना अखेर फाशी दिल्यानंतर सुप्रिया सुळे, अरविंद केजरीवाल, संजय निरुपम यांची प्रतिक्रिया
तर गेल्या सात वर्षांपासून निर्भया प्रकरणी खटला सुरु असून आरोपी त्यांची फाशीची सुटका थांबवण्यात यावी यासाठी विविध मार्गांचा अवलंब करत होते.
निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपी मुकेश, पवन, विनय आणि अक्षय या चार जणांना अखेर आज फाशीची शिक्षा पहाटेच्या वेळी देण्यात आली. तर गेल्या सात वर्षांपासून निर्भया प्रकरणी खटला सुरु असून आरोपी त्यांची फाशीची सुटका थांबवण्यात यावी यासाठी विविध मार्गांचा अवलंब करत होते. मात्र कोर्टाने अखेर त्यांची कोणतीही गय न करता त्यांची फाशीची शिक्षा कायम ठेवली. याच पार्श्वभुमीवर निर्भयाची आई-वडिल, वकिल यांच्यासह अन्य जणांनी तिहार जेलच्या बाहेर आनंद व्यक्त केला आहे. तर निर्भयाची आई आशादेवी यांनी आज अखेर निर्भयाला न्याय मिळाला असल्याचे म्हटले आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रीय सुळे, दिल्ली मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या ट्वीट मध्ये असे म्हटले आहे की, अखेर गुन्हेगारांना फासावर लटकवण्यात आले आहे. कायद्याचा सन्मान राखला गेला असून येथे कायद्याचे राज्य आहे. त्यामुळे महिलांवर अत्याचार करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. तर आरोपींची फाशी ही गुन्हे करणाऱ्या मानसिकतेला सणसणीत चपराक आहे.(Nirbhaya Case Convicts Hanged: निर्भयाला न्याय मिळाला! दिल्ली सामुहिक बलात्कार प्रकरणातील चार ही दोषींना तिहार जेल मध्ये फाशी)
तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त करत असे म्हटले आहे की, सात वर्षानंतर आज निर्भयाच्या दोषींना फाशी मिळाली आहे. तर यापुढे निर्भयासारखे दुसरे प्रकरण होणार नाही असा संकल्प करुया.
काँग्रेस नेते संजय निरुमप यांनी निर्भयाच्या आईने जे त्यांच्या मुलीला न्याय मिळण्यासाठी प्रयत्न केले त्यासाठी सलाम केला आहे. तसेच #NirbhayaHasWon असा हॅशटॅग सुद्धा त्यांनी वापरला आहे.
दरम्यान, काल या चौघांना आपापल्या कुटुंबाची भेट घेऊ देण्यात आली होती. काल कोर्टात अक्षय च्या पत्नीने निर्भयाची आई आशादेवी यांचे पाय पकडून आपल्या नवऱ्याची फाशी रोखा अशी विनंती केली. मात्र पटियाला कोर्टाकडुन फाशी कायम ठेवण्यात आली, यानुसार आज सकाळी पवन जल्लाद यांच्याकडून चौघांना फाशी देण्यात आली. तब्बल 7 वर्षे, 3 महिने आणि 3 दिवसांनंतर निर्भया बलात्कार पीडितेला न्याय मिळाला आहे.