भारतीय प्रजासत्ताक दिनी आज मुंबईत होणार दोन नव्या योजनांचा शुभारंभ; नाईटलाईफ आणि शिवभोजन थाळीचा समावेश

ठाकरे सरकारकडून मुंबईत ‘नाईट लाईफ’ (Night Life) आणि राज्यात ‘शिवथाळी’ (Shiv Thali) या दोन्ही योजनांचा शुभारंभ केला जाणार आहे.

Nightlife And Shiv Thali (Photo Credits: Px here and Wikimedia)

देशभरात प्रजासत्ताक दिनाचा (Republic Day) उत्साह मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी फार महत्त्वाचा असा दिवस आहे. या दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज मुंबईसह महाराष्ट्रात दोन महत्वपुर्ण योजनेचा शुभारंभ करणार आहे. ठाकरे सरकारकडून मुंबईत ‘नाईट लाईफ’ (Night Life) आणि राज्यात ‘शिवथाळी’ (Shiv Thali) या दोन्ही योजनांचा शुभारंभ केला जाणार आहे. नाईट लाईफ बाबत झालेल्या बैठकींनंतर अखेर पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचा महत्त्वपूर्ण ‘नाईट लाईफ’योजनेला सरकारकडून हिरवा कंदिल मिळाला. ही योजना आजपासून सुरु होत आहे.

आज मध्यरात्रीपासून (27 जानेवारी) मुंबईत प्रायोगिक तत्त्वावर काही निश्चित केलेल्या ठिकाणी रात्रभर हॉटेल्स, मॉल, थिएटर सुरु ठेवण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने बीकेसी, नरिमन पॉईंट, कालाघोडा यांसह विविध ठिकाणच्या हॉटेल, पब, मॉल्स, थिएटरचा समावेश असण्याची शक्यता आहे.

तर दुसरीकडे राज्यातील गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात शिवभोजन उपलब्ध करुन देण्याच्या योजनेचा शुभारंभ आजपासून होणार आहे. अन्न, नागरीपुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे याची संपूर्ण जबाबदारी दिली आहे.

हेदेखील वाचा- मुंबई 24x7 ला राज्य मंत्रिमंडळाची मंंजुरी; 27 जानेवारीपासून शहरात 'नाईट लाईफ' सुरू

शिवभोजन योजनेअंतर्गत सुरु करण्यात येणाऱ्या भोजनालयात 2 चपात्या, 1 वाटी भाजी, 1 मूद भात आणि 1 वाटी वरण समाविष्ट असलेली जेवणाची थाळी 10 रुपयाला देण्यात येईल.

नाईटलाईफ हा प्रयोग सध्या मुंबईपुरताच यशस्वी ठेवण्यात आला आहे. त्यानंतर पुढे भविष्यात पुणे, नाशिक यासारख्या विविध शहरात नाईट लाईफ सुरु करण्याबाबत विचार केला जाणार आहे. तर दुसरीकडे मुंबईसह महाराष्ट्रात वर्दळीच्या ठिकाणी शिवभोजनालय असेल. ही भोजनालये दुपारी 12.00 ते 2.00 या कालावधीत कार्यरत राहतील. या भोजनालयात दुपारी 12.00 ते 2.00 या कालावधीत या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी राखीव जागा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित भोजनालय चालकाची असेल.