New Rule For BEST Passengers: आता बेस्टच्या बसमध्ये मोठ्या आवाजात फोनवर बोलण्यास मनाई; व्हिडीओ पाहण्यासाठी हेडफोनचा वापर अनिवार्य
बेस्टकडे 3400 बसेसचा ताफा आहे. बेस्ट मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि मीरा-भाईंदरला बससेवा पुरवते.
बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (BEST) ने आपल्या बसमध्ये प्रवास करताना लोकांना मोबाईल फोनवर मोठ्या आवाजात संभाषण करण्यास आणि हेडफोनशिवाय मोबाइल डिव्हाइसवर ऑडिओ/व्हिडिओ पाहणे व ऐकण्यास मनाई केली आहे. अधिकाऱ्यांनी गुरुवारी याबाबत माहिती दिली. सहप्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे बेस्टच्या प्रवक्त्याने सांगितले. ते म्हणाले की, प्रवासी वारंवार त्यांच्या सहप्रवाशांचा फोन जोरात वाजत असल्याच्या तक्रारी करत होते, त्यावर बेस्टने हा निर्णय घेतला असून यासंदर्भात 24 एप्रिल रोजी अधिसूचना जारी केली आहे.
नियमानुसार, प्रवाशांना आता बेस्ट बसमध्ये प्रवास करताना मोबाईलवर व्हिडिओ-ऑडिओ ऐकण्यासाठी हेडफोन वापरावे लागणार आहेत. बेस्ट ही मुंबई आणि शेजारच्या शहरांसाठी सार्वजनिक वाहतूक सेवा आहे. बेस्ट ही सार्वजनिक वाहतूक सेवा असल्याने प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी मुंबई पोलीस कायद्याच्या कलम 38/112 अन्वये हा निर्णय घेण्यात आल्याचे बेस्टच्या प्रवक्त्याने सांगितले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, सर्व संबंधित विभागांना सर्व बसेसमध्ये यासंदर्भातील सूचना प्रदर्शित करण्यास सांगितले आहे.
बेस्ट बसमध्ये काम करणाऱ्या सर्व खासगी आणि सरकारी कर्मचाऱ्यांनाही या अधिसूचनेची माहिती देण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. बेस्टकडे 3400 बसेसचा ताफा आहे. बेस्ट मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि मीरा-भाईंदरला बससेवा पुरवते. बेस्टच्या बसमधून दररोज 30 लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. (हेही वाचा: Pune-Mumbai Highway Accident: पुणे-मुंबई एक्स्प्रेसवर विचित्र अपघात; 7 वाहने एकमेकांवर आदळली, चार जण जखमी, Watch Video)
दरम्यान, नुकतेच बेस्ट बसचे मागील दार दोरीने बांधलेले दिसून आले होते. बेस्टची दयनीय अवस्था एका प्रवाशाने उघड केली होती. प्रवाशाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये बेस्ट बसचा मागील दरवाजा तुटलेला दिसत होता. या बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशाने सांगितले की, ही बस मार्ग क्रमांक 243 ची असून ती मालाड (प.) ते जनकल्याण नगरपर्यंत जाते.