Twitter War: चिमणी गिधाडांना भारी पडली! जितेंद्र आव्हाड यांचा 'ट्विटर'वरुन टोला

केंद्र सरकारने देशातील मायक्रोब्लॉगिंग साईट्सना नुकीतच नोटीस पाठवली आहे की, 'नव्या डिजिटल नियमांचे (New Digital Rules) पालन करा अन्यथा परिणामांना सामोरे जा.'

Jitendra Awhad | (Photo Credits: Facebook)

केंद्र सरकार आणि ट्विटर (Twitter) यांच्यात सुरु असलेल्या संघर्षावरुन राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड ( Jitendra Awhad) यांनी ट्विटरच्या माध्यमातून टोला लगावला आहे. आपल्या ट्विटमध्ये कोणाचाही उल्लेख न करता आव्हाड यांनी 'चिमणी गिधाडांना भारी पडली!' असे म्हटले आहे. तसेच, सोबत ट्विटरच्या लोगोची प्रतिमाही जोडली आहे. ज्यात ट्विटरचा लोगोवाला पक्षीही दिसत आहे. केंद्र सरकारने देशातील मायक्रोब्लॉगिंग साईट्सना नुकीतच नोटीस पाठवली आहे की, 'नव्या डिजिटल नियमांचे (New Digital Rules) पालन करा अन्यथा परिणामांना सामोरे जा.'

ट्विटर आणि केंद्र सरकार यांच्यातील संघर्ष गेली प्रदीर्घ काळ सुरु आहे. या संघर्षाची परिसिमा काल पाहायला मिळाली. ट्विटरने नियमांवर बोट ठेवत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह अनेक संघ नेत्यांच्या ट्विटर हॅण्डलवरील ब्लू टिक ट्विटरने हटवली. ब्लू टिक हे ट्विटर अकाऊंट अधिकृत आणि वैध असल्याचे चिन्ह आहे. हे चिन्हच हटवल्याने आपोआपच या मंडळींच्या या अकाऊंटची वैधका कमी झाली. अर्थात काहीच वेळात ट्विटरने या अकाऊंटला पुन्हा ही ब्लू टीक प्रस्थापपीत केली. परंतू, तोवर या प्रकरणावरुन बरेच नाट्य घडले.

केंद्र सरकारने ट्विटरला निर्वाणीचा इशारा देत नवे डिजिटल नियम लागू करण्याबाबत सांगितले. केंद्र सरकारच्या नव्या डजीटल नियमांनुसार सोशल मीडिया कंपन्यांना भारतात आपले कार्यालय ठेवावे लागणार आहे. या कार्यालयांचा अधिकृत पत्ता आणि सरकारकडे नोंदणी असावा. याशिवाय या कंपन्यांच्या निवासी तक्रार निवारण अधिकारी, मुख्य अनुपालन अधिकारी आणि विभागीय संपर्क अधिकारी भारतात असणे बंधनकारक आहे. महत्त्वाचे हे अधिकारी भारतीय असावेत असेही बंधन आहे. या नव्या नियमांचे पालन व्हावे यासाठी केंद्र सरकारने ट्विटरला नोटीस पाठवले आहे. दरम्यान वारंवार सूचना देऊनही ट्विटरकडून या नियमांबाबत पावले टाकण्यात आली नाहीत. परिणामी केंद्र सरकारने ट्विटरला निर्वाणीचा इशारा दिला आहे. (हेही वाचा, Central Government On Twitter: नवे डिजिटल नियम लागू करा अन्यथा परिणामांना सामोरे जा; केंद्र सरकारचा ट्विटरला निर्वाणीचा इशारा)

जितेंद्र आव्हाड ट्विट

दरम्यान, केंद्र सरकार आणि ट्विटर यांच्यातील याच संघर्षावरुन जितेंद्र आव्हाड यांनी खोचक ट्विट केले आहे. या ट्विटमधून काहीसा तीव्र आशय व्यक्त करत “चिमणी गिधाडांना भारी पडली,” असं म्हटलं आहे. आव्हाड यांच्या ट्विटमध्ये ट्विटरचा लोगो भगव्या रंगाने वेढलेला दिसतो. वरतील ट्विटरचा लोगो असलेली चिमणी आणि खाली ट्विटर असे लिहिले आहे. या ट्विटच्या माध्यमातून आव्हाड यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधल्याचे बोलले जात आहे.