संदीप नाईक, वैभव पिचड, शिवेंद्रराजे भोसले, कालिदास कोळंबकर यांचा विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा; भाजपमध्ये उद्या प्रवेश करणार असल्याची चर्चा

विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्याकडे या आमदारांनी आपला राजीनामा मंगळवारी (30 जुलै 2019) सोपवला. हे सर्व आमदार उद्या म्हणजेच बुधवारी (31 जुलै 2019) रोजी भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

Sandeep Naik Vaibhav Pichad, Kalidas Kolambkar and Haribhau Bagade | (Photo Credit: Archived, edited, representative images)

Maharashtra Assembly Election 2019: अखेर प्रसारमाध्यमं आणि राजकीय वर्तुळात सुरु असलेली चर्चा खरी ठरली. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी आपला आमदारकीचा राजीनामा दिला. शिवेंद्रराजे भोसले (Shivendrasinh Raje Bhosale),संदीप नाईक (Sandeep Naik), वैभव पिचड (Vaibhav Pichad) आणि कालिदास कोळंबकर (Kalidas Kolambkar) अशी या आमदारांची नावे आहेत. भोसले आणि पचड हे राष्ट्रवादी तर, कोळंबकर हे काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्याकडे या आमदारांनी आपला राजीनामा मंगळवारी (30 जुलै 2019) सोपवला. हे सर्व आमदार उद्या म्हणजेच बुधवारी (31 जुलै 2019) रोजी भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

संदीप नाईक

आमदार संदीप नाईक हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नवी मुंबईतील चेहरा होते. त्यांनीही आज आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्याकडे सोपवला. संदीप नाईक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश नाईक यांचे पूत्र आहे. स्वत: गणेश नाईक हे सर्व कुटुंबासह उद्या (बुधवार, 31 जुलै 2019) रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

एएनआय ट्विट

शिवेंद्रसिंहराजे भोसले

शिवेंद्रराजे भोसले हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे साताऱ्यातील आमदार होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत ते भाजप प्रवेश करणार अशी चर्चा प्रदीर्घ काळापासून रंगली होती. आजच्या राजीनाम्याने या चर्चेला केवळ बळकटीच नव्हे तर, निश्चितता मिळाली आहे. शिवेंद्रराजे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आपल्या पदाचा अद्याप राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे दिला. शिवेंद्रराजे हे आज (30 जुलै 2019) सकाळीच सातारा येथून मुंबईच्या दिशेने रवाना झाले. मुंबईत आल्यावर ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पदांचा राजीनामा देतील. तसेच, उद्या (31 जुलै 2019) ते भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा होती. अखेर त्यांनी आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

एएनआय ट्विट

वैभव पिचड

राष्ट्रवादी काँग्रेसचे अकोले येथील आमदार वैभव पिचड यांनीही आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा सभागृह अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे दिला. वैभव पिचडही गेले अनेक काळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थ असल्याची चर्चा होती. पिचड यांच्या राष्ट्रवादी सोडून जाण्याने पक्षाची मोठी हानी होणार आहे. वैभव पिचड यांचे वडील मधुकर पिचड हे आघाडी सरकारमध्ये मंत्री होते. प्रदीर्घ काळापासून ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते.

एएनआय ट्विट

कालिदास कोळंबकर

आमदार कालिदास कोळंबकर यांनीही आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे दिला. दरम्यान, कोळंबकर यांनी काँग्रेस पक्षातील आपल्या पदांचा राजीनामा या आधीच दिला आहे. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे सोमवारी (29 जुलै 2019) रोजी त्यांनी आपला राजीनामा सोपवला. या राजीनाम्यानंतर ते भाजपात प्रवेश करणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. (हेही वाचा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दिग्गजांचा उद्या भाजप प्रवेश; शिवेंद्रराजे भोसले, गणेश नाईक, चित्रा वाघ, कालिदास कोळंबकर यांच्यासह अनेक नावे चर्चेत)

दरम्यान, भाजपमध्ये होत असलेल्या पक्षप्रवेशावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस नेत्यांनी जोरदार टीका केली आहे. भाजप हे दबावाचे राजकारण करत असून, त्या माध्यमातूनच ते विरोधी पक्ष फोडत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. तर, या आरोपाला प्रत्युत्तर देताना भाजपने म्हटले आहे की, भाजप हा कोणताही पक्ष फोडत नसून, भाजपचे विचार आवडल्याने इतर पक्षातील लोक स्वत:हून पक्षात आकृष्ट होत आहेत. त्यामुळे आम्ही त्यांना प्रवेश देत आहोत, असे म्हटले आहे.