Rohit Pawar on Raj Thackeray: 'मनसेने राजकीय मोतिबिंदूची शस्त्रक्रिया करून घ्यावी', राज ठाकरे यांच्यावर रोहित पवार यांचा थेट निशाणा; फेसबुक पोस्ट चर्चेत
या पोस्टवरुन राज्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना अयोध्या दौरा स्थगित करावा लागला. यावरुन पुणे येथील सभेत त्यांनी थेट राज्यातील नेत्यांवर निशाणा साधला. अयोध्या दौऱ्याच्या विरोधाचा कट महाराष्ट्रातूनच शिजल्याचेही ते म्हणाले. हा निशाना साधताना त्यांनी कोणाचे नाव घेतले नाही. मात्र, त्यानंतर मनसेकडून सोशल मीडियावर सुरु झालेल्या फोटो वॉरवरुन ठाकरे यांच्या टीकेचा रोख कोणाकडे होता हे स्पष्ट होते. यावरुन मनसे विरुद्ध राष्ट्रवादी असे फोटोवॉर सुरु असतानाच आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी राज ठाकरे यांचा स्पष्ट उल्लेख करत फेसबुक पोस्ट लिहीली आहे. या पोस्टवरुन राज्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहेत.
रोहित पवार यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, ''राज ठाकरे साहेब राज्यातले मोठे नेते असून मला त्यांचा आदर आहे. पण भाजप आपला वापर करून घेतंय तरी MNS Adhikrut ला हे कसं कळत नसेल? खा. बृजभूषण सिंह हे कोणत्या पक्षाचे आहेत, हे तरी मनसेनं बघावं आणि आगामी महापालिका निवडणुकीत ते मुंबईत प्रचाराला आले तर मनसेने आश्चर्य वाटून घेऊ नये.
राहिला प्रश्न आदरणीय शरद पवार साहेब आणि खा. बृजभूषण सिंह यांच्या एकत्रित फोटोचा. तर पवार साहेब हे अनेक वर्षे 'महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदे'चे अध्यक्ष आहेत आणि खा. बृजभूषण सिंह हे 'भारतीय कुस्ती संघा'चे अध्यक्ष आहेत. मनसेला खेळातही राजकारण दिसत असेल तर त्यांनी तातडीने आपल्या राजकीय मोतिबिंदूची शस्त्रक्रिया करून घ्यावी. यामुळं संभाव्य अपघात टळून स्वतःच्याच पक्षाचा बचाव तरी करता येईल''. (हेही वाचा, मनसे नेते सचिन मोरे यांनी शेअर केला Brij Bhushan Singh आणि Sharad Pawar यांचा फोटो; चर्चांना उधाण)
ट्विट
मनसे नेते सचिन मोरे यांनी शरद पवार आणि बृजभूषण सिंह आणि सुप्रिया सुळे यांचा एकत्रत असलेला फोटो सोशल मीडियावरुन शेअर केला. या फोटोला 'कुछ फोटो अच्छे भी होते है, और सच्चे भी होते है,' अशी कॅप्शनही दिली. मनसे नेते गजानन काळे आणि संदीप देशपांडे यांनीही ट्विट करत मनसेच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी लागणारी रसद ही शरद पवारांनीच पुरवल्याचा आरोप मनसेने केला. या सर्व आरोपांनंतर रोहित पवार यांनी सडेतोड उत्तर देत फेसबुक पोस्ट लिहिली आहे. ज्याची राज्याच्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरु आहे.