शिवसेना पक्षासोबत सत्ता स्थापनासाठी राष्ट्रवादी कडून कोणताही प्रस्ताव नाही- अजित पवार

कारण यंदाच्या विधानसभा निवडणूकीच्या निकालानंतर भाजप-शिवसेनेमध्ये मुख्यमंत्री पदावरुन वाद सुरु आहेत. दुसऱ्या बाजूला काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांकडून सत्ता स्थापनाबाबत विधाने केली जात आहेत.

Ajit Pawar (Photo Credits-ANI)

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीनंतर सत्ता स्थापनाचा मुहूर्त अद्याप ठरलेला नाही. कारण यंदाच्या विधानसभा निवडणूकीच्या निकालानंतर भाजप-शिवसेनेमध्ये मुख्यमंत्री पदावरुन वाद सुरु आहेत. दुसऱ्या बाजूला काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांकडून सत्ता स्थापनाबाबत विधाने केली जात आहेत. मात्र अद्याप कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. याच दरम्यान राष्ट्रवादी पक्षाचे नेते अजित पवार यांनी मोठे विधान केले आहे. अजित पवार यांनी मीडियासोबत बातचीत करताना असे म्हटले आहे की, आम्ही कोणाच्या संपर्कात नाही आहोत. तसेच राष्ट्रवादीकडून शिवसेनेसोबत सत्ता स्थापनाचा प्रस्ताव सुद्धा दिलेला नाही. आम्ही विरोधी पक्षाची भुमिका पार पाडावी असा जनादेश मिळाला असून त्यासाठी तयार आहोत.

मात्र शिवसेनेकडून भाजपची सत्ता स्थापनेसाठी कोंडी करण्यात येत असल्याचे सध्या चित्र दिसून येत आहे. एवढेच नाही युतीबाबत 50-50 फॉर्म्युल्यानुसार काही गोष्टी होणे आवश्यक असल्याचे शिवसेनेकडून भाजपला सांगण्यात आले आहे. तसेच शिवसेनेने त्यांचे मुखपत्र सामना मधून भाजपवर टीका केली आहे. त्यामध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, राष्ट्रपती तुमच्या खिशातले आहेत का? खरंतर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी विधान करत असे म्हटले की, राज्यात जर सत्ता स्थापन न झाल्यास राष्ट्रपती राजवट लागू होईल.('आमची तयारी पूर्ण, भाजपशिवाय सरकार स्थापन करणार'; शिवसेना नेते संजय राऊत यांचा खळबळजनक दावा)

दुसऱ्या बाजूला शिवसेना-भाजप मध्ये सत्ता वाटपावरुन वाद सुरु आहेत. याच परिस्थितीत काँग्रेस पक्षाचे खासदार हुसैन दलवई यांनी सोनिया गांधी यांना पत्राद्वारे शिवसेनेला समर्थन द्यावे असा सल्ला दिला आहे. तर महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक 288 जागांवर लढवण्यात आली. त्यापैकी भाजपला 105, शिवसेनेला 56, राष्ट्रवादी 54 आणि काँग्रेस पक्षाला 44 जागांवर विजय मिळवता आला आहे.