राष्ट्रवादीचे नेते Ajit Pawar यांनी घेतली CM Eknath Shinde यांची भेट; जाणून घ्या कोणत्या गोष्टींवर झाली चर्चा
याआधी मंगळवारी, शिवसेना (यूबीटी) प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईतील 'सिल्व्हर ओक' या निवासस्थानी भेट घेतली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेतली. यावेळी त्यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीबाबत चर्चा केली. शिंदे यांनी अहमदनगर आणि धाराशिव जिल्ह्यातील शेतकर्यांच्या भेटीनंतर एका दिवसानंतर ही बैठक झाली. आज दुपारी सह्याद्री अतिथीगृहात ही बैठक सुमारे 50 मिनिटे चालली. यावेळी पवार यांनी मुख्यमंत्र्यांसमोर अनेक मागण्या मांडल्या, ज्यांची यथोचित दखल घेण्यात आली.
यापूर्वी पवारांनी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून मार्च आणि एप्रिलमध्ये झालेल्या अतिवृष्टीसंदर्भात काही मागण्यांची यादी सादर केली होती. विधानसभेतील विरोधी पक्षनेते या नात्याने पवार यांनी त्यांना एनडीआरएफच्या नियमांनुसार परवानगी दिलेल्या रकमेच्या दुप्पट मदत देण्याचे आवाहन केले होते.
आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत अजित पवार यांनी राज्यातील अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याबाबत चर्चा केली. या बैठकीत विशेष मदत पॅकेजच्या घोषणेवरही लक्ष वेधण्यात आले, जे लवकरच जाहीर होण्याची अपेक्षा आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार पवार यांनी केलेल्या मागण्यांचा आठवडाभरात आढावा घेतला जाणार असून, बदलांची अंमलबजावणी वेगाने केली जाईल.
मात्र, या बैठकीमुळे पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारच्या एकजूटीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याआधी मंगळवारी, शिवसेना (यूबीटी) प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईतील 'सिल्व्हर ओक' या निवासस्थानी भेट घेतली होती. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या कोणाशीही सल्लामसलत केली नाही, असे या पवार यांनी एका मुलाखतीत सांगितल्यानंतर ठाकरे यांनी शरद पवारांची भेट झाली. (हेही वाचा: Pune: अजित पवारांविरोधात पुण्यातील भाजपा पदाधिकाऱ्याची पोलिसात तक्रार, जिवाला धोका असल्याची भीती केली व्यक्त)
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सावरकर, गौतम अदानी यांच्या विरोधात हिंडेनबर्ग अहवालाची जेपीसी चौकशी, ईव्हीएममध्ये फेरफार, पंतप्रधान मोदींची पदवी अशा विविध मुद्द्यांवरून एमव्हीएमधील मतभेदांची चर्चा सुरू आहे. या मुद्द्यांवर एमव्हीएच्या नेत्यांनी दिलेल्या परस्परविरोधी प्रतिक्रियांमुळे ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये मतभेद असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या एकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.