Pandharpur-Mangalvedha Constituency By-Election: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून भगीरथ भारत भालके यांना उमेदवारी जाहीर; जयंत पाटील यांची माहिती

तर, बुधवारी (31 मार्च) नामनिर्देशन पत्रांची छाननी होईल.

NCP (Photo Credit: Twitter)

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या (Pandharpur-Mangalvedha Constituency By-Election) रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. तसेच अनेक राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. या निवडणुकीत राष्ट्रावादी काँग्रेस पक्षाकडून (NCP) कोणत्या नेत्याला मैदानात उतरवण्यात येणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी दिवंगत भारत भालके (Bharat Bhalke) यांचे सुपुत्र भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांना उमेदवारी देण्यात आल्याची माहिती दिली आहे. या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची उद्या (30 मार्च)  शेवटची तारिख आहे. तर, बुधवारी (31 मार्च) नामनिर्देशन पत्रांची छाननी होणार आहे.

आदरणीय शरद पवार साहेब यांच्या मान्यतेने पंढरपूर - मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत श्री. भगीरथ भारत भालके यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार घोषित करण्यात येत आहेत. ते नक्की विजय होतील, असा आम्हाला विश्वास आहे. भगीरथ भालके यांना शुभेच्छा!, असा आशयाचे ट्विट जयंत पाटील यांनी केले आहे. हे देखील वाचा- 'महाराष्ट्राची वाट लावू नका'; निलेश राणे यांचा अजित पवार यांना टोला

जयंत पाटील यांचे ट्वीट-

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भारत भालके यांचे 27 नोव्हेंबर 2020 रोजी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. त्यांनी सलग तीन वेळा विधानसभेचे प्रतिनिधित्व केले. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवत त्यांनी माजी आ. सुधाकर परिचारक यांचा पराभव करत विजयाची हॅट्ट्रिक नोंदवली होती.