Ajit pawar Jan Sanman Melava: अजित पवारांचे बारामतीमध्ये मोठे शक्तीप्रदर्शन; राज्यव्यापी जनसन्मान मेळाव्याचे आयोजन
आगामी विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटापेक्षा अधिक यश मिळविण्यासाठी अजित पवार गटाने कंबर कसली असल्याचे सांगितले जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने आता विधानसभा निवडणुकीपुर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या अंगणातून शक्तीप्रदर्शनाची सुरुवात केली. आज बारामती येथे राज्यव्यापी जनसन्मान मेळावा आयोजित करून कार्यकर्त्यांमध्ये नवचेतना भरली. या मेळाव्यासाठी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांच्यासह राज्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्री, राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार, विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (हेही वाचा - मुंबईला जगाची आर्थिक राजधानी बनविण्याचं स्वप्न; पंतप्रधान मोदींच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन)
आगामी विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटापेक्षा अधिक यश मिळविण्यासाठी अजित पवार गटाने कंबर कसली असल्याचे सांगितले जात आहे. नुकत्याच विधानपरिषदेच्या निवडणुकीत महायुतीने 11 पैकी 9 जागांवर विजय मिळविला. यामध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे दोन्ही उमेदवार निवडून आले. या विजयामुळे अजित पवार गटाचा आत्मविश्वास हा चांगलाच वाढला आहे. यामुळे आता त्यांनी आगामी विधानसभा निवडणूकीसाठी जोरदार तयारी केली आहे.
विधानपरिषदेच्या निवडणुकीत अजित पवार गटाने शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर यांचा विजय झाला. या विजयाने आपण हुरळून जाणार नाही, तर आगामी विधानसभा निवडणुकीत आणखी ताकदीने विजयासाठी प्रयत्न करणार असल्याचे अजित पवार म्हणाले. दरम्यान बारामतीमध्ये आज जनसमान रॅली आयोजित करण्यात आली होती. या रॅलीमध्ये बोलताना छगन भुजबळ यांनी शरद पवारांवर जोरदार तोफ डागताना गंभीर आरोप केले. मात्र, त्यांचे भाषण पूर्ण होताच 'एक मराठा लाख मराठा'च्या जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. भुजबळ यांनी आपल्या भाषणातून मराठा समाजाचा मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करताना शरद पवार यांच्यावरती जोरदार टीका केली.