NCMC कार्डचं ऑनलाईन रिचार्ज करूनही बॅलन्स दिसत नाहीये? 'या' एका स्टेपशिवाय पैसे कधीच जमा होणार नाहीत!
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एमएसआरटीसी) एनसीएमसी कार्डचा ऑनलाईन रिचार्ज केल्यानंतरही अनेक प्रवाशांना कार्डवर बॅलन्स न दिसण्याची समस्या भेडसावत असून, बस कंडक्टरकडील ई-टीआयएम मशीनवर कार्ड 'सिंक' केल्याशिवाय ही रक्कम वापरता येत नसल्याचे समोर आले आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) वापरणार्यांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अनेक प्रवासी मोबाईलवरून NCMC कार्डचा ऑनलाईन रिचार्ज करतात, मात्र बँक खात्यातून किंवा युपीआयमधून पैसे कापले जाऊनही कार्डमध्ये बॅलन्स दिसत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. यामागील नेमके कारण आणि त्यावरील सोपा उपाय याविषयी सविस्तर माहिती घेऊया.
NCMC कार्ड मध्ये का दिसत नाही ऑनलाईन रिचार्जचा बॅलन्स
एनसीएमसी कार्ड हे सर्वसामान्य डेबिट किंवा क्रेडिट कार्डपेक्षा वेगळ्या पद्धतीने काम करते. ऑनलाईन रिचार्ज केल्यानंतर पैसे बँक खात्यातून वजा होतात आणि त्याबाबतचा यशस्वी व्यवहाराचा (ट्रान्झॅक्शन) मेसेजही प्रवाशाला मिळतो. मात्र ही रक्कम सुरुवातीला कार्डच्या 'अनक्लिअर' (Unclear) या विभागात जमा होते, ती थेट 'वॉलेट बॅलन्स'मध्ये दिसत नाही. त्यामुळे रिचार्ज यशस्वी होऊनही कार्ड प्रत्यक्ष प्रवासासाठी वापरता येत नाही.
NCMC कार्ड 'कार्ड सिंक' म्हणजे नेमके काय?
'अनक्लिअर' मधील रक्कम मुख्य वॉलेट बॅलन्समध्ये वर्ग होण्यासाठी 'कार्ड सिंक' (Card Sync) किंवा 'सिंक बॅलन्स' (Sync Balance) ही प्रक्रिया पार पाडावी लागते. ही प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय ऑनलाईन भरलेली रक्कम प्रवाशाला प्रत्यक्षात वापरता येत नाही.
बॅलन्स सिंक कसे करावे
ऑनलाईन रिचार्ज केल्यानंतर बॅलन्स सक्रिय (अॅक्टिव्ह) करण्यासाठी प्रवाशांकडे दोन पर्याय उपलब्ध आहेत. नक्की वाचा: MSRTC प्रवाशांसाठी गुड न्यूज! आता BHIM App द्वारे करता येणार NCMC कार्ड टॉप-अप .
- बसमध्ये प्रवास करताना: एसटी बसने प्रवास करताना आपले एनसीएमसी कार्ड बस कंडक्टरकडील ई-टीआयएम (ETIM) मशीनवर ठेवून 'Sync Balance' किंवा 'Card Sync' करण्याची विनंती करावी.
- डेपो किंवा एजंटकडे जाऊन: ज्या केंद्रावरून किंवा एजंटकडून एनसीएमसी कार्ड काढण्यात आले आहे, तेथे जाऊनही ई-टीआयएम मशीनवर कार्ड सिंक करून घेता येते.
मशीनवर कार्ड सिंक झाल्यानंतरच 'अनक्लिअर' मधील रक्कम मुख्य वॉलेट बॅलन्समध्ये जमा होते आणि त्यानंतरच कार्ड प्रवासासाठी वापरता येते.
प्रवाशांमध्ये संभ्रम
ही तांत्रिक प्रक्रिया अनेक प्रवाशांना माहीत नसल्याने, विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि प्रथमच डिजिटल पद्धतीने रिचार्ज करणाऱ्या प्रवाशांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण होत आहे. पैसे कापले गेल्याचे बँकेचे मेसेज मिळूनही कार्डवर रक्कम न दिसल्याने अनेकांना आपली फसवणूक झाल्याची किंवा रिचार्ज अयशस्वी झाल्याची शंका येते. प्रत्यक्षात मात्र रक्कम सुरक्षित असते आणि केवळ कार्ड सिंक करण्याची एक साधी पायरी बाकी राहिलेली असते.
प्रवाशांनी काय लक्षात ठेवावे
एनसीएमसी कार्डधारकांनी ऑनलाईन रिचार्ज केल्यानंतर शक्य तितक्या लवकर आपले कार्ड बस कंडक्टरकडील ई-टीआयएम मशीनवर किंवा संबंधित एजंट/केंद्रावरील मशीनवर टॅप करून सिंक करून घ्यावे, जेणेकरून रिचार्ज केलेली रक्कम त्वरित वापरता येईल. ही एक पायरी वगळल्यास ऑनलाईन भरलेली रक्कम कार्डवर सक्रिय होत नाही, हे प्रवाशांनी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.