एसटी प्रवासात NCMC Card सक्तीमुळे राज्यभरात गोंधळ; जाणून घ्या कसं, कुठे काढाल कार्ड

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने १ सप्टेंबरपासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी एनसीएमसी कार्ड सक्ती केली आहे पण नोंदणी केलेल्या पण कार्ड न मिळालेल्या प्रवाशांना ३० सप्टेंबरपर्यंत नोंदणीच्या पावतीवर सवलतीच्या दरात प्रवास करता येणार आहे.

ST Bus | (Photo credit: archived, edited, representative image)

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) बसमधून प्रवास करणाऱ्या महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी 1 सप्टेंबरपासून राष्ट्रीय सामान्य गतिशीलता कार्ड (NCMC Card) अनिवार्य करण्यात आले आहे. या निर्णयानंतर राज्यभरात अनेक ठिकाणी मोठा गोंधळ उडाल्याचे चित्र समोर आले आहे. अनेक पात्र प्रवाशांकडे अद्याप कार्ड उपलब्ध नसल्याने त्यांना सवलत नाकारून पूर्ण तिकीट घ्यावे लागल्याच्या तक्रारी विविध भागांतून समोर येत आहेत.

NCMC Card च्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने स्पष्ट केले आहे की, ज्या प्रवाशांनी एनसीएमसी कार्डासाठी नोंदणी केली आहे परंतु त्यांना अद्याप प्रत्यक्ष कार्ड मिळालेले नाही, अशा प्रवाशांना नोंदणीची पावती दाखवून 30 सप्टेंबर 2026 पर्यंत सवलतीच्या दरातील मॅन्युअल तिकिटावर प्रवास करता येणार आहे. ज्या लाभार्थ्यांकडे सक्रिय (अ‍ॅक्टिव्ह) एनसीएमसी कार्ड आहे, त्यांना त्याच कार्डाद्वारे सवलतीचे तिकीट देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हाताचे ठसे न उमटण्यासारख्या तांत्रिक अडचणींमुळे ठराविक वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्डाची सक्ती सध्या तात्काळ लागू करण्यात आलेली नाही, असेही महामंडळाकडून सांगण्यात आले आहे.

NCMC कार्ड काढायचं कसं?

  • एसटी बस स्थानक: तुमच्या जवळच्या प्रमुख एसटी बस स्थानकात जाऊन तुम्ही या कार्डासाठी अर्ज करू शकता.
  • कागदपत्रे: NCMC कार्ड काढण्यासाठी तुम्हाला तुमचे आधार कार्ड आणि मोबाईल नंबर देणे आवश्यक आहे.
  • नोंदणी शुल्क: कार्ड साठी प्रवाशांना 199/- शुल्क देणे आवश्यक आहे. तसेच तुम्ही तुमचे जुने स्मार्ट कार्ड जमा केल्यास 149/- रुपये देणे आवश्यक राहील.
  • NCMC कार्ड वितरण: परिवहन महामंडळ नोंदणी अधिकारी मार्फत तुमची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्हाला पुढील 1 महिन्या नंतर तुमचे NCMC कार्ड तुमच्या राहत्या पत्त्यावर भारतीय डाक मार्फत पाठवले जाईल. अथवा तुम्ही ज्या एसटी डेपोमध्ये स्वतःच्या कार्ड ची नोंदणी केली तेथे तुमचे NCMC कार्ड दिले जाईल.

NCMC कार्डची वैशिष्ट्ये

  1. किंमत: नवीन कार्ड 199/- रुपये (GST सह). जुने स्मार्ट कार्ड जमा केल्यास 149/- रुपयांत उपलब्ध.
  2. वॉलेट मर्यादा: किमान 100/- रुपये; 50/- रुपयांच्या पटीत रिचार्ज.
  3. रिचार्ज सुविधा: ईटीएम मशीन, अधिकृत संकेतस्थळ, मोबाईल अ‍ॅप किंवा नियुक्त एजंटकडून सहज रिचार्ज.
  4. नोंदणीसाठी व्यापक यंत्रणा: ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या सोयीसाठी 3000 हून अधिक अधिकृत एजंट नियुक्त करण्यात आले आहेत.
  5. बसस्थानकांवरच नोंदणीची प्रक्रिया पार पडणार असल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.

NCMC कार्ड रिचार्ज करण्याची पद्धत:

  • जवळच्या एसटी बस स्थानक खिडकीवर जाऊन कार्ड रिचार्ज करता येईल.
  • ऑनलाईन बँकिंग, UPI (Google Pay, PhonePe) किंवा मोबाईल ॲपद्वारे.
  • बस कंडक्टरकडे असलेल्या ई-तिकीट मशीनद्वारे देखील तुमचे NCMC कार्ड रिचार्ज करू शकता.

एसटी महामंडळाने महिला आणि ज्येष्ठ नागरिक प्रवाशांना जवळच्या एसटी आगाराशी संपर्क साधून एनसीएमसी कार्डाची नोंदणी आणि वितरण प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच, ज्यांच्याकडे आधीच कार्ड आहे त्यांनी सवलतीच्या तिकिटासाठी कार्डमध्ये आवश्यक रक्कम शिल्लक (टॉप-अप) असल्याची खात्री करून घ्यावी, असेही सांगण्यात आले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement