Nawab Malik on Anil Deshmukh Case: नवाब मलिक पुन्हा आक्रमक, म्हणाले 'अनिल देशमुख यांनाही बोगस प्रकरणात अडकवले, आम्ही हा डाव उलटवून लावू'

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) अटक प्रकरणावरुन मलिक यांनी परम बीर सिंह यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

Nawab Malik | (Photo Credits: Facebook)

एनसीबी (NCB) अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर पाठिमागील काही दिवसांवासून जोरदार निशाणा साधणारे राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) अटक प्रकरणावरुन मलिक यांनी परम बीर सिंह यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. अनिल देशमुख यांना खोट्या प्रकरणात अडकवण्यात आले. हा राजकीय डाव आहे. हा डाव आम्ही उलटवून टाकू, असा इशारा मलिक यांनी दिला आहे.

मलिक यांनी म्हटले आहे की, अनिल देशमुख यांच्यावर आरोप करणारे मुंबईचे माजी आयुक्त परमबीर सिंह स्वत: फरार आहेत. ते स्वत: तक्रारदार असून फरार आहेत. त्यामुळे त्यांची चौकशी कधी होणार? जर तक्रारदारच फरार असेल तर चौकशी कशाची करायची? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. दरम्याना, समिर वानखेडे यांच्यावर निशाणा साधत नवाब मलिक यांनी आणखी काही खळबळजनक आरोप केले आहेत. समीर वानखेडे यांनी एका अधिकाऱ्याच्या मुलालाही बोगस ड्रग्ज प्रकरणात अडकवले आहे. या प्रकरणात त्याने तोंड उघडू नये यासाठी त्याच्यावर दबाव टाकण्यात येतो आहे. (हेही वाचा, Nawab Malik Statement: भाजपच्या माजी मंत्र्याने मंदिरासाठी दान केलेली जमीन बळकावली आहे, नवाब मालिकांचा आरोप)

समीर वानखेडे यांच्यावरुन नवाब मलिक पाठिमागील काही दिवसांपासून आक्रमक आहेत. दरम्यान, केंद्रीय तपास यंत्रणांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निर्धार पक्का केल्याचे दिसत आहे. शरद पवार यांनी विदर्भातील एका सभेत बोलताना म्हटले आहे की, ''देशमुखांना जेलमध्ये टाकलं त्याची किंमत आज ना उद्या वसूल झाल्याशिवाय राहणार नाही. राज्य चालवायचे असते ते दिलदारपणे. सत्तेचा वापर करायचा सन्मानाने. सत्ता आली की पाय जमिनीवर ठेवायचे. मात्र ज्यांचे पाय जमिनीवर राहात नाहीत व सत्ता डोक्यात जाते त्यांच्या हातून सत्त गेल्यावर असं घडतं''. त्यानंतर नवाब मलिक यांनीही आज हिच भूमिका मांडली की, 'हा राजकीय डाव आहे. हा डाव आम्ही उलटवून टाकू.'