Navi Mumbai Airport Naming Controversy: प्रकल्पग्रस्तांचे सिडको भवन ला आज घेराव आंदोलन; नवी मुंबईत वाहतूक व्यवस्थेत बदल

आज कोपरखैरणे ते सीबीडी, खारघर ते सीबीडी आणि नेरुळ ते सीबीडी बेलापूर ही वाहतूक बंद असणार आहे.

Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: PTI)

नवी मुंबई विमानतळाला (Navi Mumbai Airport) लोकनेते दि बा पाटील (D B Patil)  यांचं नाव देण्याच्या मागणीसाठी आज प्रकल्पग्रस्त भूमीपुत्र सिडको कार्यालयाला (Cidco Bhavan) घेराव घालणार आहे. दरम्यान या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज नवी मुंबई मध्ये सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे. सुमारे 5 हजार पोलिसांचे बळ तैनात करण्यात आले आहे तर काही ठिकाणी वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. या सिडको घेराव आंदोलनामध्ये लाखभर लोक सहभागी होणार असल्याची शक्यता आहे. (नक्की वाचा: आगामी Navi Mumbai International Airport चालवण्याची जबाबदारी Adani Group कडे; महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता).

दरम्यान आज 24 जून हा दि बा पाटील यांचा स्मृतिदिन आहे. आणि या दिवसाचं औचित्य साधत नवी मुंबई मधील स्थानिक सिडको कार्यालयाला घेराव घालणार आहेत. नवी मुंबई मध्ये प्रस्तावित विमानतळाला दि बा पाटील यांचं नाव देण्याची स्थानिकांची मागणी आहे तर शिवसेनेकडून बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा विचार केला जात आहे. तर काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नवी मुंबईतील विमानतळ हे मुंबई विमानतळाचंच एक्सटेंशन असल्याने छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव संयुक्तिक राहणार असल्याची भूमिका जाहीर केली होती. स्थानिक आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर ही भूमिका त्यांनी स्पष्ट केली होती.

वाहतूकीमधील बदल

आजच्या नवी मुंबईतील आंदोलनामुळे वाहतूक व्यवस्थेमध्येही काही बदल करण्यात आले आहेत. सकाळी 8 ते रात्री 8 अशा 12 तासांसाठी जड वाहनांची वाहतूक नवी मुंबई शहरात बंद असेल. ठाणे-बेलापूर रस्त्यावर हलकी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली आहे. आज कोपरखैरणे ते सीबीडी, खारघर ते सीबीडी आणि नेरुळ ते सीबीडी बेलापूर ही वाहतूक बंद असणार आहे. मुंबई-पुणे वाहतूक देखील महापे शिळफाटा वरून जाईल. पुणे-मुंबई वाहतूक ही तळोजा, मुंब्रा, महापे मार्गे असणार आहे.

दरम्यान दिबा पाटील, बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबतच बंजारा समाजाने वसंतराव नाईक आणि प्रितिश नंदीं कडून जेआरडी टाटा यांच्या नावाची देखील मागणी केली आहे.