नाशिक: कसारा घाटात रस्ता खचला; भेगा पडल्याने महिनाभर वाहतूक बंद

आता कसारा घाटातील स्थितीही चिंताजनक झाली आहे. पावसामुळे कसारा घाटातील रस्ता खचला आहे. तर रस्त्यांवरही मोठ्या भेगा पडल्याने सुरक्षेच्या कारणास्तव कसारा घाटातील वाहतूक ठप्प झाली आहे.

Kasara Ghat (Photo Credits: Twiiter/ MyTitwala)

मुंबई सह कोकण आणि पुणे सह नाशिक भागामध्ये धुव्वाधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे जनजीवन स्थगित झालं आहे. मुंबई नाशिक रेल्वे ट्रॅकवरही दरड कोसळल्याचे सत्र मागील काही दिवसांपासून वाढले आहे. आता कसारा घाटातील (Kasara Ghat) स्थितीही चिंताजनक झाली आहे. पावसामुळे कसारा घाटातील रस्ता खचला आहे. तर रस्त्यांवरही मोठ्या भेगा पडल्याने सुरक्षेच्या कारणास्तव कसारा घाटातील वाहतूक ठप्प झाली आहे.  मुंबई-नाशिकच्या जुन्या महामार्गावर (Mumbai Nashik Old High Way) रस्ता खचल्यामुळे हा मार्ग बंद ठेवण्यात आला आहे.  पुढील महिन्याभरासाठी कसारा घाटातील वाहतूक बंद ठेवली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. लवकरच या रस्ता दुरूस्तीचं काम हाती घेण्यात येऊन त्याच्या डागडुजीचं काम हाती घेतलं जाणार आहे.

कसारा घाटातील  रस्ता खचल्याने नव्या मार्गावरुन सर्व वाहतूक चालवण्यात येणार आहे. मागील आठवड्याभरापासून नाशिक मध्ये जोरदार पाऊस पडत आहे. गंगापूर धरण, गोदावरी नदीने धोक्याची पातळी पार केल्याने नाशिक शहरात त्र्यंबकेशवर मंदीरामध्येही पाणी घुसले आहे.  पहा महाराष्ट्रातील आजच्या पावसाचे लाईव्ह अपडेट्स

नाशिक शहरामध्ये दरड कोसळल्याने अनेक दुर्घटना समोर आल्या आहेत. मागील 24 तासामध्ये नाशिकमध्ये 6 वाडे कोसळले आहेत. यामुळे नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. आता सुरक्षेच्या कारणास्तव कसारा घाटातील रस्ते वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.