IPL Auction 2025 Live

Child Swap Nashik: नाशिक येथे बालकांची आदलाबदल, मुलीचा शस्त्रक्रियेनंतर मृत्यू

रुग्णालयाच्या चौकशीत मुलीची योग्य ओळख पटली आहे.

Baby | Representational Image (Photo Credits: Pixabay)

नाशिक सिव्हिल हॉस्पिटल येथील आदलाबदली झालेल्या कथीत बाळांपैकी (Child Swap Nashik) एका मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू (Newborn Death In Nashik) झाला आहे. ही घटना शहरातील एका खासगी रुग्णालयात बुधवारी (23 ऑक्टोबर) सकाळी घडली. बाळावर त्याच्या पोटातील आतड्यांवर निर्माण झालेल्या गुंतागुंतीवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. या बाळाची आदलाबदल झाल्याचा (Child Swap Controversy) आरोप तिची आई आणि कुटुंबीयांनी केला होता. प्राप्त माहितीनुसार, आईने 15 ऑक्टोबर रोजी आपण मुलाला जन्म दिल्याचा दावा करत 19 वर्षीय महिलेच्या कुटुंबीयांनी सुरुवातीला मुलीला स्वीकारण्यास नकार दिल्याने हा वाद सुरू झाला. यामुळे रुग्णालयात चौकशी सुरू झाली, ज्यात बाळाची खरोखरच आदलाबदल झाल्याचे पाहायला उघड झाले.

रुग्णालय प्रशासनाने केलेल्या चौकशीत स्पेशल न्यूबॉर्न केअर युनिटमध्ये (SNCU) लिपिकाकडून झालेली वैद्यकीय नोंद चूक घडल्याने बाळाच्या लिंग ओळखीबाबत त्रूटी निर्माण झाली. या प्रकारात कर्मचाऱ्यांनी चुकून नवजात अर्भकाचे चुकीचे लिंग नोंदवले, ज्यामुळे कुटुंबाला त्यांचे बाळ मुलगा आहे असा विश्वास वाटू लागला.

तपासात ओळखीची पुष्टी

चौकशीनंतर नाशिक सिव्हिल हॉस्पिटलने (Nashik Civil Hospital) पुष्टी केली की, आईने 13 ऑक्टोबर रोजी एका मुलीला जन्म दिला होता. रुग्णालयाच्या नोंदींमधील चुकीच्या नोंदींमुळे गोंधळ झाल्याचे आढळून आले. सिव्हिल सर्जन चारुदत्त शिंदे यांच्या नेतृत्वाखालील समितीने मुलाची ओळख पटविण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज आणि वैद्यकीय नोंदी वापरल्या. जन्मापूर्वी निदान झालेल्या मुलीच्या आतड्यांसंबंधी विकृतीने तिला जोडप्याचे जैविक मूल म्हणून सत्यापित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. जन्मानंतर लगेचच या आरोग्याच्या समस्येमुळे बाळाला एसएनसीयूमध्ये हलवण्यात आले होते. (हेही वाचा, St. George Hospital Controversy: मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयातील कर्मचाऱ्याचा उपचाराविना मृत्यू; तीन तास वाट पाहूनही डॉक्टर अनुपलब्ध)

शरीरातील गुंतागुंतीमुळे मृत्यू

आतड्यांच्या स्थितीसाठी यशस्वी शस्त्रक्रिया करूनही, बाळाला डिसेमिनेटेड इंट्राव्हॅस्क्युलर कोग्युलेशन (डी. आय. सी.) या दुर्मिळ आणि गंभीर रक्ताच्या गुठळ्या होण्याच्या विकाराने ग्रासले. ज्यामुळे शेवटी तिचा मृत्यू झाला. चौकशीनंतर बाळाला स्वीकारलेल्या कुटुंबीयांनी त्याचे बुधवारी दुपारी अंतिम संस्कार केले. (हेही वाचा, Medical Negligence: डॉक्टरांकडून चुकीचे इंजेक्शन; महिलेचा मृत्यू; केरळ राज्यातील घटना)

तपासानंतर, या चूक आणि गोंधळास कारण ठरलेल्या नऊ डॉक्टर आणि चार परिचारिकांवर कारवाई करण्यात आली. नाशिक सिव्हिल हॉस्पिटलने या घटनेबद्दल खेद व्यक्त केला असून, भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी रुग्णाच्या नोंदी व्यवस्थापनामध्ये अधिक काळजीपूर्वक बाबी केल्या जातील असे म्हटले आहे. दरम्यान, बाळाची आदलाबदली झाल्याच्या प्रकरणामुळे रुग्णालय प्रशासन, रुग्णालयातील रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि परिसरातही खळबळ उडाली होती. प्रसारमाध्यमांतूनही हे प्रकरण प्रचंड चर्चिले गेले. अखेर या प्रकरणाचा असा करुण अंत झाला.