Nashik District Grampanchayat Result: एकनाथ शिंदे गटाला धक्का; नवनियुक्त जिल्हाध्यक्षाचा ग्रामपंचायत निवडणुकीत पराभव

ग्रामपंचायत सरपंच पदासाठीच्या निवडणुकीत शिंदे गटाचे ग्रामिणचे जिल्हाध्यक्ष भाऊलाल तांबडे यांचा पराभव झाला आहे. या ठिकाणी राष्ट्रवादीच्या सोनाली चारोस्कर या विजयी झाल्या आहेत.

Jallosha ( file image)

नाशिक जिल्ह्यात (Nashik District Grampanchayat Result) एकनाथ शिंदे गटाला (Eknath Shinde Group) मोठा धक्का बसला आहे. ग्रामपंचायत सरपंच पदासाठीच्या निवडणुकीत शिंदे गटाचे ग्रामिणचे जिल्हाध्यक्ष भाऊलाल तांबडे यांचा पराभव झाला आहे. या ठिकाणी राष्ट्रवादीच्या सोनाली चारोस्कर या विजयी झाल्या आहेत. तळेगाव ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालादरम्यान ही माहिती आली आहे. दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील एकूण 82 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकांची मतमोजणी आज सकाळी साडेदहा वाजलेपासून सुरु आहे. दरम्यान, ग्रामपंचायतीचे निकाल हळूहळू जाहीर होत आहेत.

दिंडोरी, कळवण (Kalwan) आणि नाशिक तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आतापर्यंत हातील आलेल्या निकालानुसार बऱ्याच ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली आहे. दिंडोरी तालुक्यात जवळपास 50 ग्रामपंचायती रिंगणात आहेत. दरम्यान, तळेगाव ग्रामपंचायतीची निवडणूक अतिशय अटीतटीची झाली होती. या निवडणुकीत एकनाथ शिंदे गटाचे भाऊलाल तांबडे सरपंच पदासाठी मैदानात होते. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेले बंड आणि त्यांनी विभागावर नेमलेले पदाधिकारी याची सुरुवातीपासूनच चर्चा आहे. त्यातच भाऊलाल तांबडे यांना जिल्हा ग्रमिण अध्यक्ष केल्याने उत्सुकता वाढली होती. (हेही वाचा, Gram Panchayat Election Result 2022: राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांची आज मतमोजणी; 608 पैकी 51 आगोदरच बिनविरोध)

दरम्यान, सरपंच पदासाठी थेट जनतेतून उभे असलेल्या भाऊलाल तांबडे यांना पराभव स्वीकारावा लागला आहे.या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सोनाली चारोस्कर सरपंच म्हणून निवडून आल्या आहेत. तांबडे यांच्यावर दुहेरी नामुष्की अशी की, एका बाजूला सरपंच पदासाठी रिंगणात असलेल्या तांबडे यांचा पराभव तर झालाच. पण त्यांचे पॅनलही पराभूत झाले. त्यामुळे संपूर्ण ग्रामपंचायतीवरच आता राष्ट्रवादीचे वर्चस्व राहणार असे चित्र आहे.